भुसावळ। प्रत्येकाने बदलत्या काळासोबत बदलणे गरजेचे आहे. ऑनलाईन व्यवहार करण्यावर नागरिकांनी भर दिला पाहिजे. त्यामुळे सोबत रोख पैसे बाळगण्याची गरज पडणार नाही. ऑनलाईन प्रणालीचा वापर करून बदलत्या आधुनिक जगाचे आपण साक्षीदार व्हावे, असे आवाहन आमदार संजय सावकारे यांनी केले. डिजिटल प्रदान मोहीमेअंतर्गत पंचायत समितीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात डिजीधन मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुप्पहार अर्पण करून मेळाव्यास सुरूवात झाली.
यावेळी आमदार सावकारे म्हणाले की, आज जग बदलत चालले आहे. व्यवहार ऑनलाईन होत आहेत. शहरांमध्ये स्वॅप मशीन, पेटीअमद्वारे व्यवहार होऊ लागले आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता ऑनलाईन व्यवहारांचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तहसीलदार मिनाक्षी राठोड यांनीही संवाद साधला. डिजिटल सप्ताहात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, सभापती सुनील महाजन, उपसभापती मनीषा पाटील, गटविकास अधिकारी एस.बी. मावळे, सहायक गट विकास अधिकारी आर.ई. पाटील, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, बांधकाम विभागाचे अभियंता एस.एस. मौर्य यांच्यासह नागरिक उपस्थित होते.