मुंबई । परवाना नसताना राज्यात ऑनलाइन सट्टा करणार्या कंपनी विरुद्ध कारवाई करण्यात येईल तसेच त्यांची वेबसाइट तत्काळ ब्लॉक केली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व अन्य सदस्यांनी गेम किंग इंडिया या कंपनीमार्फत ऑनलाइन सट्टा चालवल्याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना डॉ. रणजित पाटील म्हणाले, ऑनलाइन सट्टाबाबतची माहिती सायबर सेलकडून घेण्यात येईल तसेच याबाबत केंद्र शासनाकडून माहिती मागवण्यात आली आहे. त्यांच्याकडून माहिती प्राप्त होताच संबंधित आरोपींवर कारवाई करण्यात येईल.
यासंदर्भात शासन गंभीर असून कोणालाही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी स्वतंत्र समिती नेमण्यात येईल. सर्व ऑनलाइन लॉटरीसंदर्भात माहिती तंत्रज्ञान कायद्यात दुरुस्ती करण्याचा विचार केला जाईल, असेही डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.