ऑनलाईन कामांमुळे हरणखेड ठरले ‘स्मार्ट ग्राम’

0

बोदवड । ग्रामविकास विभागाने घेतलेल्या ‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेत बोदवडमधून हरणखेड हे दोन हजार लोकसंख्येचे गाव ग्रामविकासाचे मॉडेल म्हणून समोर आले आहे. लोकसहभागातून गरजेची कामे आणि ऑनलाइन कामकाज करणार्‍या या ग्रामपंचायतीचा तब्बल 10 लाखांचे बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. सरपंच समिता गांधी ग्रामसेवक श्रीकृष्ण पाटील यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.

ग्रामपंचायतीतील सर्व कामे चालतात ऑनलाइन पद्धतीने
हरणखेड ग्रामपंचायतीची स्थापना 1962 मध्ये झाली होती. सध्या या गावाची लोकसंख्या दोन हजार आहे. ’स्मार्ट ग्राम’साठी आदर्श गाव पाटोदा येथील भास्कर पेरे-पाटील यांनी हरणखेड येथे सातत्याने प्रबोधन केले. हागणदारीमुक्ती, लोकसहभागातून जलसंधारणाच्या कामांचे महत्त्व पटवून दिले. परिणामी, ग्रामस्थांनी एकत्र येऊन निर्धार करत तालुक्यातील ’पहिले हागणदारीमुक्त गाव’ असा किताब पटकावला. दरम्यान, बोदवड तालुक्यातील इतर गावांमध्ये पाणीटंचाईची ओरड होत असली तरी, हरणखेडमध्ये भारत निर्माण योजनेसोबतच ओडीएद्वारे मुबलक पाणीपुरवठा केला जातो. तसेच स्मशानभूमीत काँक्रिटीकरण वृक्षारोपण देखील झाले आहे. एवढेच नव्हे, तर ग्रामपंचायतीतील सर्व कामे ऑनलाइन पद्धतीने चालतात. कृषी विकास योजनेला लोकसहभागाची जोड देत गावात दोन मोठे बंधारे बांधले आहेत. दलित वस्तीमध्ये भूमिगत गटारी तयार झाल्या असून, गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षणासाठी डिजिटल शाळानिर्मितीचा प्रयोगही यशस्वी झालेला आहे. 97 टक्के ग्रामस्थांचे बँक खाते आणि आधार नोंदणी झालेली आहे. एवढेच नव्हे, तर यापूर्वी सन 2008-09मध्ये हरणखेडला ’निर्मल ग्राम’चा पुरस्कारदेखील मिळाला होता. ग्रामस्थांची साथ मिळाली म्हणूनच हरणखेड ’स्मार्ट ग्राम’ पुरस्काराचे मानकरी ठरले. आता शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी आरओ प्लांट नळांना मीटर बसवण्याचा मानस आहे.