अकोले । नगर जिल्ह्यातील अकोले येथील शिक्षकांनी शिक्षण विभागाच्या ऑनलाइन कामावर बहिष्कार टाकला आहे. पंचायत समिती परिसरात झालेल्या सभेत हे शिक्षक सामुदायिकरीत्या शिक्षण विभागाच्या अधिकृत ‘व्हॉट्सअॅप’ गटामधून बाहेर पडले. ऑनलाइन कामासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी अशी या शिक्षकांची मागणी आहे.
गुणवत्तेवर परिणाम
संगणक प्रणाली वापरून शिक्षण विभागाची ऑनलाइन कामे करताना शिक्षकांचा वेळ वाया जातो. त्याचा शाळांच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होतो. म्हणून यापुढे आम्ही अशी ऑनलाइन कामे करणार नाही, असे सांगण्यासाठी पंचायत समितीसमोर प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीची सभा झाली. पाचशे शिक्षक, मुख्याध्यापक या सभेसाठी जमले होते. ऑनलाइन कामांना विरोध नाही, मात्र त्यासाठी आर्थिक तरतूद करून स्वतंत्र यंत्रणा अस्तित्वात आणावी. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत पटसंख्येइतक्या उत्तररपत्रिका पुरवाव्यात, लोकसहभागाची सक्ती करू नये, प्रशासकीय आदेश व्हॉट्सअॅपवरून न देता लेखी वा तोंडी कळवावेत, सरकारी शाळांना सवलतीच्या दरात वीज द्यावी, फेसबुक, ट्विटर वापरायची सक्ती करू नये, शासकीय उपक्रमात सेवावर्ग केलेल्या शिक्षकांच्या जागी तातडीने शिक्षक नेमावेत आदी मागण्या करण्यात आल्या.