भाड्याच्या फ्लॅटमधून फसवणुकीचा गोरखधंदा करणारे चौघे ताब्यात ; एटीएमचा पीन, ओटीपीच्या माध्यमातून गंडा ; खात्यातून ऑनलाईन शॉपिंग करुन महागड्या वस्तूची खरेदी व विक्रीचा फंडा
जळगाव- बँकेतून मॅनेजर बोलतोय, एटीएम कार्ड खराब झाले आहे अशा पध्दतीने भामटेगिरी करुन एटीएमचा पिन नंबर मिळवून ऑनलाईन गंडा घालणार्या दिल्लीच्या टोळीचा जळगाव सायबर ठाण्याच्या पोलिसांनी पर्दाफाश केला असून चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा मोबाईल व लॅपटॉप, आयपॉड असा एैवज जप्त करण्यात आला आहे. दिल्ली येथे एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये कॉल सेंटरव्दारे अनेकांचे खाते क्रमांक, एटीएमचा पासवर्ड, पिन मिळवून त्या माध्यमातून ऑनलाईन गंडविण्याचा गोरखधंदा सुरु होता. फसवणूक करुन संबंधितांच्या खात्यातून ऑनलाईन शॉपिंग करुन महागड्या वस्तू खरेदी करायच्या व त्या कमी किमतीत विक्री केल्या जावून चौघे पैसे मिळवित असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अटकेतील चारही जणांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राचार्याला गंडा
जळगाव शहरारातील रहिवासी डॉ. अजय ओंकारनाथ दाहाड हे चांदवड येथील वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्याच्या मोबाईलवर फोन करुन भामट्याने मी एस.बी.आय.क्रेडीट कर्ड हेडच्या कार्यालयातून बोलत असून तुमचे अगोदर एसबीआय बॅकेचे प्राईम कार्ड असल्याने त्या कार्डसाठीची वार्षिक फी 3539 रुपये तुमच्या खात्यातून वजा करण्यात आली असून ती तुम्हाला परत करावयाची असे भासवून क्रेडीडकार्ड वरील सोळा अंकी व ओटीपी मिळवून 1 लाख 66 हजार 800 रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला होता. याप्रकरणी 28 मार्च 2019 रोजी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाल होता.
असा लागला संशयितांचा छडा
डॉ. दाहाड यांच्या फोनवर आलेला क्रमांक तसेच दाहाड यांच्या खात्यातून ज्या वस्तूंची ऑनलाईन खरेदी करण्यात आली होती. त्या दुकानदाराच्या खात्याची सायबर पोलिसांनी माहिती मिळविली. त्यानुसार संशयित दिल्ली येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अरुण निकम यांनी तपासकामी उपनिरिक्षक अंगत नेमाने, पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत बेलदार, दिलीप चिंचोले, श्रीकांत चव्हाण यांचे पथक दिल्लीला रवाना केले. दोन ते तीन दिवस पथक दिल्लीत ठाण मांडून माहिती घेत होते. पक्की खात्री झाल्यावर पथकाने सापळा रचून सुरुवातीला म्होरक्या भुपेंदर सिंग कुमार मुकेश कुमार वय 20 रा, ईश्वर कॉलनी सह अर्जून पार्क, नजबगढ, नवी दिल्ली, अमन लांबा बालकिशन लांबा वय 21, उत्तमनगनर, नवी दिल्ली, या दोघांना अटक केली, यानंतर राहूल कौशिक सुरेश कुमार वय 21 उत्तमनगर नवी दिल्ली, व नितीन राकेश टंडन वय 24 रा. उत्तम नगर नवी दिल्ली यांच्या मुसक्या आवळल्या. अमनला पकडतेवळी पथकातील कर्मचार्यासोबत झटापट झाल्याचीही माहिती मिळाली आहे.
मास्टरमाईंडची लिव्ह इन रिलेशनमध्ये राहून फसवणूक
अटकेतील चौघे पदवीची द्वितीय तसेच तृतीय वर्षाला शिकत होते. मात्र पैसे कमविण्याचा सोप्पा मार्ग सापडल्याने सर्वांनी शिक्षण सोडले. भूपेंदर हा गुन्ह्यातील मास्टर माईंड आहे. तो यापूर्वी एका कॉलसेंटरमध्ये कामाला असून उत्कृष्ट संभाषणाच्या कौशल्याने पोलीसही अवाक् झाले आहेत. तो त्याच्या प्रेयसीसोबत भाड्याच्या ÷फ्लॅटमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतो. प्रेयसीमुळे त्याची अमनसोबत मैत्री झाली यानंतर दोघांनी भाड्याने दुसरा फ्लॅट घेवून फसवणुकीचा गोरखधंदा सुरु केला. नितीन व राहूल यांना पैशांची कडकी असल्याने भूपेंदर व अमन यांनी दोघांना हेरले.
प्रत्येकाने वाटून घेतली कामाची जबाबदारी
अमन हा बँकेची खाते, नावे, खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक अशी माहिती संकलित करुन आणायचा. त्याआधारावर संपर्क साधून उत्कृष्ट संभाषणामुळे भूपेंदर मी बँकेचा मॅनेजर यासह विविध कारणे सांगून फसवणूक करायचा. एटीएमचा पासवर्ड अथवा पिननंबर अथवा सोळा आकडी नंबर मिळाल्यावर त्याआधारावर भूपेंदर संबंधितांच्या नावानेच फोन पे, पेटीएम अशी अॅप बनवून खाते तयार करायचा. नितीन व राहूल हे खात्यावरुन शोरुम, मॉलमधून महागडे मोबाईल तसेच वस्तू खरेदी करायच्या. ते वस्तू आणल्यावर पुन्हा कमी विक्री करायच्या अशी त्यांच्यावर जबाबदारी होती. तसेच नितीन व राहूल कमिशनवर काम करायचे मोहिम फत्ते झाल्यावर चौघेही पैसे वाटून घ्यायचे. अशाप्रकारे संशयितांनी नऊ ते दहा सव्वा ते दीड लाख रुपये किमतीचे महागडे मोबाईल खरेदी केले आहे यापैकी डॉ. दाहाडच्या खात्यावरुन खरेदी केलेला एक दीड लाखाचा व इतर एक फोन असे दोन महागडे फोन व फसवणुकीसाठी वापरण्यात आले मोबाईल असे एकूण 10 मोबाईल व लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले आहे.
अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
अटक करण्यात आलेल्या चौघांना शनिवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता 20 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. चौघेही संशयित चांगल्या घरचे असल्याची माहिती मिळाली आहे. दिसायला हायप्रोफाईल असलेल्या चौघा संशयितांनी दिल्लीत बसून राज्यभरातील अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. दरम्यान कुठल्याही अज्ञात व्यक्तीला बॅकेची खात्याची तसेच एटीएमबाबत माहिती सांगू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.