आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आदेश
धुळे – राज्य शासनाच्या आदेशानूसार धुळे महापालिकेने बांधकाम परवानगी देण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. शहरातील सर्व बिल्डर आणि इजिनियांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महापालिकेकडे ऑनलाईन नोंदणी न करणार्या बिल्डर व इजिनियरांना नोटीस बजवा, असे आदेश आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिले. गुरुवारी मनपाच्या सभागृहात स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त बोलत होते. महापालिकेकडे ऑफलाईन 325 बिल्डर आणि ईजिनियरांनी नोंदणी केली आहे. मात्र ऑनलाई नोंदणीसाठी 129 जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी 107 जणांनाची नोंदणी अपलोड करण्यात आली आहे. महापालिकेला 30 हजार 900 रुपये फि स्वरुपात मिळाले आहे.
विविध विषयांना दिली मंजूरी
बैठकीत यावेळी उपायुक्त रविंद्र जाधव, स्थायी समिती सभापती वालीबेन मंडोरे, मनोज वाघ यांच्यासह स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. स्थायी समितीसमोर आलेल्या तीनही विषयांना मंजुरी देण्यात आाली. त्यात महापालिकेच्या नवीन इमारतीत एयर कंडीशनर, लिफ्ट व अन्य उपकरणे बसविण्यास मान्यता देण्यात आली. शहरातील एकविरादेवी मंदीर परिसरातील भक्त निवासाच्या इमारती देखभाल दुरुस्तीसाठी आलेल्या निविदा विषय आणि स्वच्छ भारत अभियान 2018 अंतर्गत इंदौर येथे आभ्यास दौरा करणे कामी भांडार विभाग मार्फत वाहन उपलब्ध करुन देणे व खर्चाला मंजुरी देण्यात आली.
घंटागाडी येत नसल्याची नागरीकांची ओरड
सभेला सुरुवात होताच नगरसेवक कैलास चौधरी यांनी एकविरा देवी मंदीर परिसरातील अतिक्रमण निर्मूलन करण्याचा विषय समोर आणला. उपायुक्त रविंद्र जाधव यांनी त्यांना दोन दिवसात याबाबत संबंधितांना पत्र देण्याचे आदेश दिली. नगरसेवक अमिन पटेल यांनी प्रभागात स्वच्छता होत नाही. घंटागाडी येत नाही. प्रभागात स्वच्छता नसल्याने नागरिक व्हॅास्अॅप, फेसबुक या सोशल मिडीयाच्या माध्यामातून नगरसेवकांची बदनामी करतात. अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.
नगरसेवक गुलाब माळी यांनी शहराजवळील वरखेडी रोडवरील पाणी प्रश्न सोडवा. याभागात घंटागाडी आणि टॅक्टरच्या माध्यमातून स्वच्छता करावी अशी मागणी केली. नगरसेवक खताळ यांनी दरवर्षी शहरातून बालाजी थर काढण्यात येतो. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा अशी मागणी केली. नगरसेवक कमलेश देवरे यांनी सांगितले की, शहरातील सर्वच प्रभागात घंटागाडी येत नाही. डेंग्यू, मलेरियाची साथ सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने तत्काळ नियोजन करावे. देवरे यांनी सांगितले की, धुळ्यातील नागरिक नविन बांधकाम परवानगी घेण्यासाठी महापालिकेकडे अर्ज दाखल करीत आहेत. मात्र, त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुचना दिल्या जात आहे. नागरिकांना याबाबत अधिक ज्ञान नाही.