पिंपरी : बँकेतून बोलत असल्याचे सांगून बँक खात्याची किंवा एटीएम कार्डची गोपनीय माहिती विचारुन फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असून यामध्ये केवळ तरुण बळी पडत नसून ज्येष्ठ नागरिकांना सहजपणे टार्गेट केले जात असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आयुष्याच्या उतारपणासाठी पै पै करून जमा केलेली पुंजी एका क्षणात डोळ्यादेखत जाते तेंव्हा या ज्येष्ठ नागरिकांवर अक्षरशः आभाळ कोसळते. एटीएम कार्डचा वापर कसा करावा, त्याबाबतची गोपनीयता कशी बाळगावी याबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने चोरट्यांचा ज्येष्ठ नागरिक म्हणजे ’सॉफ्ट टार्गेट’ बनले आहेत.
कार्ड बदलून साडेचार लाख लंपास
निवृत्ती वेतन किंवा आयुष्यभर कमावलेली पुंजी ज्येष्ठ नागरिक आपल्या बँक खात्यात जपून ठेवतात. उतारवयात, आजारपणात या साठवलेल्या पैशाचा त्यांना मोठा आधार असतो. परंतु या ज्येष्ठ मंडळींना ऑनलाईन बँकिंग व्यवहाराच्या माहितीचा, त्याबाबतच्या दक्षतेची व्यवस्थित माहिती नसल्यामुळे सायबर क्राइम करणार्या चोरट्यांचे फावले आहे. थेरगाव येथे एका 57 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला एटीएम मशीनमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने चोरट्याने हातचलाखीने त्यांचे एटीएमकार्डच बदलून टाकले. महिनाभराच्या कालावधीतून कार्डद्वारे त्यांच्या खात्यातून परस्पर चार लाख 46 हजार रुपये काढण्यात आले. चोराने वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांच्या खात्यावरून पैसे काढले. हा सर्व प्रकार लक्षात आला तेंव्हा एक महिन्याचा कालावधी उलटून गेला होता.
मी बँकेतून बोलतोय
दुसर्या घटनेत पिंपरी येथील एका 55 वर्षीय ज्येष्ठाला ’मी बँकेतून बोलत आहे व तुमच्या एटीएमचा पीन बदलावयाचा आहे. सुरक्षिततेसाठी तो बदलणे गरजेचे आहे’ असे सांगून त्या कार्डची सर्व गोपनीय माहिती विचारून घेतली. काही दिवसातच या माहितीच्या आधारे त्यांच्या खात्यातून 50 हजार रुपये काढून घेण्यात आले. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे खाते एका क्षणात साफ केले आहे. म्हणूनच प्रत्येकाने खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
अशी घ्या दक्षता
* अज्ञात व्यक्तींना किंवा ओळखीच्या व्यक्तींनाही देवू नका बँक खात्याची, एटीएम कार्डचा पीन याची माहिती
* एटीएममध्ये मदत लागल्यास केवळ सुरक्षा रक्षक किंवा घरातील व्यक्तीचीच मदत घ्या.
* कोणतीही बँक फोनवरुन माहिती विचारत नाही. त्यामुळे कोणत्याही अज्ञात व्यक्तीला माहिती देऊ नका.
* मेसेज किंवा फोनवरुन तुम्ही लॉटरी किंवा कार जिंकल्याची बतावणी कुणी करत असल्यास अशा भूलथापांना बळी पडू नका
* खरेदीवेळी कार्ड स्वाईप करताना सर्व व्यवहार स्वतःच्या उपस्थितीतच करा, दुकानदार किंवा वेटरच्या हातात कार्ड देऊ नका.
* एटीएमचा पीन ठराविक कालावधीनंतर बदला. तो कुठेही लिहून ठेवू नका.
* बँकेत जाऊनच खात्याशी संबंधित माहिती किंवा इतर कागदोपत्री बदल करावेत.