रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने सापळा रचून केली कारवाई
भुसावळ- ऑनलाईन सेवा केंद्रधारकांनी तत्काळ तिकीटांचा काळाबाजार सुरू करून प्रवाशांची आर्थिक लूट सुरू केली होती.याबाबत रेल्वेच्या सुरक्षा बलाकडे तक्रारी प्राप्त झाल्याने सुरक्षा बलाने तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी विशेष अभियान सुरू केले आहे. अभियानातंर्गत सुरक्षा बलाच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ विभागातील अकोला येथील एका सायबर कॅफेवर छापा टाकून 15 अवैध ई तिकीटांसह तिघांना अटक करण्यात आली. यामुळे तिकीटांचा काळाबाजार करणार्यांचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, शनिवार, 12 मे रोजी यासंदर्भात ‘दैनिक जनशक्ती’ने सडेतोड वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
तक्रारीच्या रेट्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाकडून कारवाई
रेल्वेच्या सुरक्षा बलाने काळाबाजारातील तिकीटांवर प्रतिबंधासाठी विभागीय वरीष्ठ सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. अभियानादरम्यान पथकाला मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे निरीक्षक प्रवीणकुमार कस्बे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशु शर्मा, सुमित सैनी, संजीव राय, समाधान वाहुलकर, अंबिका यादव, आरक्षक मनीष शर्मा, योगेश पाटील, विनोद जेठवे यांनी गुरूवार, 24 रोजी सापळा रचून पवन इंटरनेट कॅफेवर छापा टाकून अवैधरीत्या विकली जाणारी 15 तिकीटे जप्त करण्यात आली. या तिकीटांची किंमत 21 हजार 675 रूपये असून छाप्यात एक संगणक, लॅपटॉप, जियो वायफाय डोंगल, प्रिंटर आदी साहित्य जप्त करण्यात आले. शिवाय, या प्रकरणात कॅफे चालक रमेश गेडीमल लाछवानी (वय 50, रा.अकोला) याच्यासह त्याच्या शालकाची दोन्ही मूले करण सारवानी (वय22) आणि अर्जुन सारवानी (वय 31)अशा तिघांना अटक करण्यात आली.
‘जनशक्ती’ने केले होते वृत्त प्रसिद्ध
रेल्वे विभागातील इतर रेल्वेस्थानकाप्रमाणेच भुसावळ रेल्वे स्थानकावरही तिकीटांचा काळा बाजार होतो. याबाबत ‘दैनिक जनशक्ती’ने शनिवार, 12 मे रोजी ‘भुसावळात रेल्वेच्या आरक्षीतसह तत्काळ तिकीटासाठी दलालांचे विस्तारलेेय जाळ’े अशा मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.