जळगाव । व्यापार्यांना गेले वर्षभर विक्री कराची विवरणे ऑनलाईन सरळपणे भरता आलेली नाहीत. 1 एप्रिल 2016 पासून यंत्रणाच कार्यान्वित झालेली नाही. ऑक्टोबर 2016 पासून कसे बसे काम सुरू होते. त्यात आता सॅप सिस्टीमचा वापरही सुरू झाला आहे. ऑनलाईन सर्व्हरचे इतर प्रश्न निर्माण झाले आहेत. अशा स्थितीत विक्रीकर सन 2016-17 ची विवरणे भरणे जवळपास ठप्प झाले आहे. यंत्रणेतील दोषामुळे विवरणपत्रे सादर करण्याच्या कार्यवाहीला उशीर होणार आहे. त्यावरील दंडाचा विनाकारण भूर्दंड व्यापार्यांना भरावा लागेल. ही बाब लक्षात घेवून विक्रीकराची विवरणे ऑनलाईन भरण्याची मुदत 30 जून 2017 पर्यंत वाढवावी अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळ व जळगाव जिल्हा कर सल्लागार संघटनेच्या पदाधिकार्यांनी व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा, कर सल्लागार संघटनेचे अध्यक्ष अॅड.एम.आर.शिरुडे यांच्यासह सीए अनिल शाह, सुरेश चिरमाडे, युसूफभाई मकरा, पुरुषोत्तम टावरी, साहेबराव पाटील यांनी पत्रकार परीषदेत माहिती दिली.
आजही ऑनलाईन यंत्रणा काम करीत नाही
राज्याच्या उत्पन्नात सर्वाधिक म्हणजे 70 टक्के महसूल विक्रीकराच्या माध्यमातून गोळा होतो. मागीलवर्षी 1 एप्रिल पासून विक्रीकराची विवरणपत्र नव्या प्रणालीनुसार ऑनलाईन करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केल्याची घोषणा सरकारने केली. मात्र पहिल्या दिवसापासून ती यंत्रणा सुरूच झाली नाही. त्यानंतर ऑक्टोबर 2016 मध्ये यंत्रणा सुरू झाल्याचे सांगण्यात आले. परंतू त्यासाठीचा सर्व्हर नेहमी ऑऊट ऑफ सर्व्हीस होत असे. आता डिसेंबर 2016 अखेरची विक्रीकर विवरणे भरण्याची मुदत दि. 21 एप्रिलपर्यंत होती. मात्र, या काळातही सर्व्हर ऑऊट ऑफ सर्व्हिस होता. अखेर व्यापार्यांनी तक्रार केल्यानंतर ही विवरणे भरण्याची मुदत दि. 26 पर्यंत वाढविली आहे. पण आजही ऑनलाईन यंत्रणा काम करीत नाही. व्यापारी मंडळी व कर सल्लागार रोज 24 तास ऑनलाईनवर विवरणे भरण्यासाठी संगणकाशी खेळत आहेत. गेले वर्षभर विक्रीकर विवरणे ऑनलाईन सरळपणे भरली गेलेली नाहीत.
विक्रीकर विवरणपत्रे ऑनलाईन भरण्यासाठी सदोष संगणकीय व इंटरनेट प्रणाली वापरली आहे. त्याची रितसर चाचणी झालेली नाही. शिवाय, आता सॅप सिस्टीम (सिस्टिम ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग) याचा वापरही सुरू केला आहे. मात्र त्यातही अनेक दोष व त्रृटी आहेत. म्हणूनच व्यापारी किंवा कर सल्लागार मंडळी विक्रीकर विवरण वेळेवर भरु शकत नाही. ही बाब लक्षात घेवून विक्रीकर विवरणपत्रे ऑनलाईन भरण्याची मुदत दि. 30 जून 2017 पर्यंत वाढवावी अशी मागणी दोन्ही संघटनंनी संयुक्तपणे केली आहे. अन्यथा विक्रीकर विभागाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दोन्ही संघटनांनी दिली आहे.
या आहेत व्यापार्यांच्या अडचणी
टीन नंबर बरोबर टाकल्यावरही दुसर्याची पावती दिसणे, मागील परतावा असलेला कर आता न दिसणे, आताचा कर कमी असला तरी तो देय दिसणे, एकाच कामासाठी वारंवार लॉग ईन करावे लागणे, सन 2008-09 व 2009-10 मधील चलन नोंदी न दिसणे, जीएसटी वेबसाईटही अर्धवट दिसणे आदी समस्या असून त्या त्वरीत पुर्ण करावे. केंद्र सरकार व्यापार्यांसाठी जीएसटी लागू करत आहे. त्यासाठी वेबसाईट तयार आहे. त्यावर काम करताना प्रत्येक वस्तूचा एचएसएन कोड टाकावा लागतो. या कोडची यादीही अपुरी आहे. अनेक वस्तुंचे कोड त्यात नाहीत. जीएसटीचे रजिस्ट्रेशन केल्याशिवाय सेवा कर विवरण भरता येत नाही. अशा अनंत प्रकारच्या अडचणी सध्या व्यापारी वर्गासमोर आहेत.