पिंपरी-चिंचवड : सध्या धकाधकीच्या आयुष्यात भाजी खरेदीपासून ते लग्न जमवणे इथपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन झाल्या आहेत. मात्र, या गोष्टी जेवढ्या सोप्या आहेत तेवढ्याच त्या घातक सुद्धा आहेत. याचा फटका जुनी सांगवी येथील एका युवकाला बसला आहे. महेश विलास पाटील (वय 36, रा. जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून काव्या जयवंतराव असलकर या महिलेविरोधात तक्रार दिली आहे.
इमोशनल ब्लॅकमेलिंग करून लूट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील यांनी लग्नासाठी जीवनसाथी डॉट कॉम व मराठी मॅट्रिमोनी या साईटवर लग्नासाठी प्रस्ताव टाकला होता. त्यातून सप्टेंबर 2017 मध्ये संबंधित महिलेशी त्यांची ओळख झाली. यातून त्यांचे पुढे फोनवरही बोलणे झाले. मात्र, पुढे महिलेने माझ्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे व ऑपरेशन करायला माझ्याकडे पैसे नाहीत, असे सांगितले. भावनिक होऊन पाटील यांनी तिने दिलेल्या युनियन बँकेच्या खात्यावर सुरुवातीला दीड लाख रुपये भरले. पुढे हेच कारण पुढे करत एक 15 दिवसांच्या अंतराने पुन्हा 50 हजार मागितले जे पाटील यांनी पुन्हा महिलेच्या खात्यावर टाकले. मात्र, हे पैसे भरल्यानंतर महिलेने 23 ऑक्टोबरपासून पाटील यांचे फोन उचलणेच बंद केले. संबंधित महिलेचा पत्ता माहित नसल्याने तिच्यापर्यंत पोहोचणे कठीण झाल्याने फिर्यादी यांनी सांगवी पोलीस ठाण्यात महिलेविरोधात फसवणुकिचा गुन्हा दाखल केला आहे.