‘ऑनलाईन’ वीजबिल भरारी 143 कोटींवर

0

पुणे। दरमहा सरासरी 100-110 कोटी रुपयांचा ’ऑनलाईन’ वीजबिल भरणा करणार्या महावितरणच्या पुणे परिमंडलातील वीजग्राहकांच्या संख्येत तीन महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. जुलै महिन्यात 6 लाख 63 हजार ग्राहकांनी मोबाईल अ‍ॅप व वेबसाईटच्या माध्यमातून 143 कोटी रुपयांचा घसबसल्या ’ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे.

पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह हवेली, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ तालुक्यात गेल्या तीन महिन्यांत ’ऑनलाईन’ वीजबिल भरणार्या वीजग्राहकांची संख्या पूर्वीच्या तुलनेत लक्षणीय वाढलेली आहे. गेल्या जुलै महिन्यात तब्बल 6 लाख 63 हजार वीजग्राहकांनी 143 कोटी रुपयांचा ’ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे. यात पुणे शहरातील 4 लाख 13 हजार 352 वीजग्राहकांनी 87 कोटी 61 लाख तर पिंपरी चिंचवड शहरातील 1 लाख 85 हजार 176 ग्राहकांनी 38 कोटी 44 लाख रुपयांचा ’ऑनलाईन’ वीजबिल भरणा केला आहे. तसेच खेड, मावळ, जुन्नर, आंबेगाव व मुळशी तालुक्यातील 64 हजार 588 ग्राहकांनी 16 कोटी 88 लाख रुपयांचा ’ऑनलाईन’ भरणा केलेला आहे.
मागील आर्थिक वर्षी दरमहा 100 ते 110 कोटी रुपयांचा सरासरी ’ऑनलाईन’ भरणा आता गेल्या तीन महिन्यांत सरासरी 141 कोटींवर गेला आहे. मे-2017 मध्ये 134 कोटी 48 लाख, जून- 2017 मध्ये 143 कोटी 25 लाख तर जुलै 2017 मध्ये 143 कोटी रुपयांचा ’ऑनलाईन’ वीजबिल भरणा झालेला आहे. यासोबतच मागील आर्थिक वर्षात सरासरी साडेपाच ते सहा लाख दरम्यान असलेली ग्राहकसंख्याही गेल्या तीन महिन्यात सरासरी 6 लाख 45 हजारांपेक्षा अधिक झालेली आहे.