पिंपरी : महापालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सुरु केलेल्या ‘ऑफिसर द वीक’ या उपक्रमामध्ये बदल करुन ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ हा उपक्रम सुरु केला आहे. महिन्यामध्ये चांगले काम करणार्या अधिकार्यांचा करंडक देऊन गौरव करण्यात येईल. त्या करंडकामध्ये अधिकार्याचे छायाचित्र बसवून तो करंडक योग्य ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा ठराव स्थायी समितीने केला आहे.
चांगले काम करणार्या अधिकार्यांना शाबासकी देण्यासाठी परदेशी यांनी हा उपक्रम सुरु केला होता. त्यामुळे काम करण्यासाठी हुरुप येत होता. आपल्या कामाची दखल घेतल्याची भावना अधिकार्यांच्या मनामध्ये येत होती. मात्र, परदेशी यांची बदली झाल्यानंतर हा उपक्रम बंद झाला. हा चांगला उपक्रम पुन्हा सुरु करण्याच्या सूचना स्थायी समितीच्या तत्कालीन अध्यक्षा सीमा सावळे यांनी केल्या होत्या. परंतु, तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. आता ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ हा उपक्रम सुरु करण्याच्या सूचना स्थायी समितीने प्रशासनाला दिल्या आहेत. ’अ’ श्रेणीतील अधिकार्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. अधिकार्यांना काम करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम पुन्हा नव्याने सुरु करण्यात येणार असल्याचे, स्थायीचे सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले.