‘ऑफिसर ऑफ द मंथ’साठी सक्षम अधिकारी मिळेना!

0

पुरस्कार जाहीर करून दोन महिने उलटले तरीही एकाचेही नाव सुचेना

पिंपरी-चिंचवड : महापालिकेमध्ये चांगले काम कऱणार्‍या अधिकार्‍यांना कौतुकाची थाप मिळावी यासाठी तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी ‘ऑफिसर ऑफ द वीक’ पुरस्कार देण्याची पध्दत राबविली होती. त्यामुळे अधिकार्‍यांचाही उत्साह वाढला होता. मात्र, परदेशी यांच्या बदलीनंतर हा पुरस्कार बंद झाला. याला चार वर्षांचा कालावधी लोटला. ही पध्दत पुन्हा सुरू करण्याचा स्थायी समितीने दोन महिन्यांपूर्वी निर्णय घेतला. परंतु, अद्यापही या पुरस्कारासाठी सक्षम अधिकारी मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

महापालिकेचा कारभारच उफराटा
महापालिकेचे काम लवकर आणि चांगल्या पध्दतीने व्हावे यासाठी ‘ऑफिसर ऑफ द वीक’ पुरस्कार सुरु केला होता. मात्र, आयुक्त परदेशी यांच्या बदलीनंतर अधिकार्‍यांना मोकळे मैदान झाले आहे. आतापर्यंत अतिरिक्त आयुक्तांच्या स्वीय सहाय्यक, पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, लेखा विभागासह बांधकाम विभागामध्येही मोठा भ्रष्टाचार सुरु आहे. अधिकारी, ठेकेदार आणि राजकीय नेता यांचे लागेबांधे असल्यामुळे भ्रष्टाचाराला अजून खतपाणी घातले जात आहे. स्वतःला सामाजिक कार्यकर्ते म्हणवणारे अनेकजण यामध्ये सहभागी आहेत. या सर्व गोष्टींमधून अधिकार्‍यांना चांगले काम करण्याची उसंत मिळत नसल्याने अजूनपर्यंत सक्षम अधिकारी महापालिकेत मिळत नसल्याची टीका आणि चर्चा केली जात आहे. बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीमध्ये या पुरस्कारासाठी कुठल्या अधिकार्‍याचे नाव आहे की नाही असे विचारले असता, आठवडाभरात नाव सांगू असे उत्तर आयुक्तांनी दिले. त्यामुळे ‘ऑफिसर ऑफ द मंथ’ चा मानकरी कोण होणार की नाही यावर महापालिकेत चर्चा रंगली होती.