ऑफिस बॉयसह इतरांनी केली 47 लाखांची फसवणूक : जळगावातील एकाला बेड्या

47 lakhs extortion through forged signatures : Suspicious in Pimprala जळगाव : लाखो रुपयांची बनावट बिले व त्या बिलांचे चेक तयार करून सह्या करणार्‍या ऑफिस बॉयसह इतरांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील पसार संशयीताला गुरुवारी दुपारी तीन वाजता एमआयडीसी पोलिसांनी पिंप्राळा येथून अटक केली. अविनाश कोमल पाटील (पिंप्राळा, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात सहभाग असलेल्या एकूण नऊ पैकी चौघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे.

फसवणूक प्रकरणी दाखल आहे गुन्हा
एमआयडीसी परिसरातील सुबोध चौधरी व त्यांचा भाऊ सुनील चौधरी यांची अनुक्रमे समृद्धी केमिकल्स आणि सुबोनिया केमिकल्स नावाची कंपनी आहे समृद्धी केमिकल्स मध्ये विशाल पोपट डोके हा ऑफिस बॉय म्हणून काम कामाला होता. विशाल डोके यांनी दोन्ही कंपन्यांच्या चेकवर बनावट स्वाक्षर्‍या करून 46 लाख 87 हजार 752 रुपयांची फसवणूक केली. बनावट सह्यांचे चेक बँकेतून वटले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
गुन्हा दाखल झाल्यापासून पसार असलेला अविनाश कोमल पाटील हा पिंप्राळा येथे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत गुरुवार, 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजता त्याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आले. यातील इतर चौघेजण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.