न्यूयॉर्क : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला ’न्यूटन’ हा चित्रपट ऑस्करमधून बाद झाला आहे. अमित मसुरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या तसेच राजकुमार राव याची मुख्य भूमिका असलेल्या ’न्यूटन’ चित्रपटाकडून भारताला अनेक अपेक्षा होत्या. मात्र आता हा चित्रपट ऑस्करमधून वगळण्यात आला. भारतातील एकूण वेगवेगळ्या 26 भाषांपैकी ’न्यूटन’ चित्रपट ऑस्करसाठी निवडण्यात आला होता.
राजकुमार रावला या चित्रपटातील त्याच्या उत्तम कामगिरीसाठी बेस्ट अॅक्टर म्हणून ’आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड’ मिळाला. त्याचप्रमाणे या चित्रपटाला बर्लिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, हाँग काँग फिल्म फेस्टिवल, स्टार स्क्रीन अवॉर्ड्सदेखील मिळाले आहेत. या चित्रपटाचा विषयदेखील जरा वेगळा होता. तरीदेखील या चित्रपटाला ऑस्करमधून का वगळण्यात आले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ऑस्करमध्ये, परदेशी भाषांतील गटांमध्ये आता एकूण 9 चित्रपटांचा समावेश आहे. त्यात, अ फँटास्टिक वुमन (चिली), इन दी फेड (जर्मनी), ऑन बॉडी अँड सोल (हंगेरी), फॉक्सट्रॉट (इस्त्राईल), द इंसल्ट (लेबनॉन), फेलिसाइट (सेनेगल), दी वुड (दक्षिण आफ्रिका), दि स्क्वेअर (स्वीडन) हे चित्रपट आहेत. आत्तापर्यंत भारतातील कुठल्याही चित्रपटाला ऑस्कर मिळाला नाही आणि आता हा चित्रपटदेखील ऑस्करमधून बाहेर गेल्याने अनेक लोक निराशा व्यक्त करत आहेत.