ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये वातावरण तापले

0

सिडनी । क्रिकेट आणि वाद हे समीकरण सगळीकडेच लागू होते. आता क्रिकेटचा ऑस्ट्रेलियामध्येही पोहोचला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरसह अन्य खेळाडूंनी या हंगामातील ऍशेस मालिकेवरच बहिष्कार टाकण्याचा खणखणीत इशारा दिला आहे. दि. 30 जूनपूर्वी सध्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली नाही तर त्यानंतर मानधन रोखण्याचा कटू निर्णय घ्यावा लागेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले होते. त्यावर डेव्हिड वॉर्नरसह आघाडीच्या खेळाडूंनी कठोर भूमिका घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळू न देण्याच्या संदर्भात देखील माहिती मिळाली होती. मागील महिन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या संघटनेने क्रिकेट ऑस्ट्रेलियाची ‘पे ऑफर’ फेटाळून लावली. सध्याची ऑफर म्हणजे क्रिकेट प्रशासकांसाठी विजय, पण क्रिकेटसाठी पराभव, अशा स्वरुपाचा असल्याची टीका त्यावेळी संघटनेने केली होती. त्यानंतर सदर खेळाडूंची संघटना व क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यात सातत्याने कलगीतुरा सुरु आहे.

‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वाढीव मानधनाची आमची मागणी मान्य करेल, असा मला विश्वास वाटतो. पण, तसे न झाल्यास आम्ही संघ सोडण्याचा निर्णय घेण्यातही गय करणार नाही आणि त्यानंतरच्या परिणामाची आम्हाला चिंताही नसेल’, अशा स्पष्ट शब्दात वॉर्नरने आपली भूमिका स्पष्ट केली. आयपीएल सोडण्यासाठी 3 वर्षे कराराची क्रिकेट ऑस्ट्रेलियाची निव्वळ हास्यास्पद होती, असेही वॉर्नर म्हणाला. वॉर्नरचा 30 वर्षीय सहकारी, डावखुरा जलद गोलंदाज मिशेल स्टार्कने देखील बहिष्कार टाकणे हाच योग्य पर्याय असल्याचा यावेळी पुनरुच्चार केला.