ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची कमाल, भारताची दाणादाण

0

पुणे : न्यूझीलंड, इंग्लंड आणि बांगलादेशला पराभूत करत कसोटीतील नंबर वन बनलेल्या टीम इंडियाला शुक्रवारी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आसमान दाखविले. पुणे येथील गहुंजे स्टेडीयमवर होत असलेल्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाची दाणादाण उडाली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६० धावांत संपुष्टात आल्यानंतर भारताला ऑस्ट्रेलियाने अवघ्या १०५ धावांत गुंडाळले आहे. यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचे ४ गडी बाद झाल्याने भारत व ऑस्ट्रेलियामधील पहिला कसोटी सामना दुसऱ्याच दिवशी रंगतदार अवस्थेत पोहोचला आहे. काल (गुरुवार) अर्धशतक झळकावून नाबाद राहिलेल्या स्टार्क याला भारतीय फिरकीपटू रवीचंद्रन आश्‍विन जडेजाकरवी झेलबाद केले. याबरोबरच ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६० डावांत आटोपला. मात्र यानंतर फलंदाजीस सुरुवात केलेल्या भारताचा पहिला डावही अवघ्या 40 षटकांत संपुष्टात आला. भारताचा डाव 105 धावांत सगळे धुरंदर माघारी निघाल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने चार गडी गमावित १४३ धावा केल्या आहेत. खेळ थांबला त्यावेळी कर्णधार स्मिथ ५९ तर मिशेल मार्श २१ धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २९८ धावांची आघाडी घेतली असून आणखी तीन दिवस शिल्लक असल्याने सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे.

भारतीय फलंदाजांनी टाकल्या नांग्या
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू स्टीफन ओ’केफी याने ३३ धावांमध्ये ६ विकेट्स घेऊन भारतीय डावाचे कंबरडे मोडले. तर मिचेल स्टार्कने दोन आणि हेजलवूड, नेथन लायन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. पहिल्या दिवसाअखेरीस ९ बाद २५६ धावा अशा स्थितीत होता. अश्विनने ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कला बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला. मात्र, प्रत्युत्तरात भारतीय फलंदाजांनी निराशा केली. भारतीय संघाने शंभरचा आकडा देखील गाठला नाही आणि सात फलंदाज तंबूत दाखल झाले होते. भारतीय फलंदाजांना अगदी नाहक विकेट्स टाकणे महागात पडले आहे. अगदी सातव्या षटकातच भारताला पहिला धक्का बसला होता. मुरली विजय झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर पुजारा आणि केएल राहुल यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.पण पुजारा देखील स्वस्तात बाद झाला. पुजारा तंबूत दाखल झाल्यानंतर पहिल्याच चेंडूवर कर्णधार कोहलीला मिचेल स्टार्कने माघारी धाडले. उपहारापर्यंत भारताची अवस्था तीन बाद ७० धावा अशी होती. दुसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू स्टीफन ओ’केफी याने कमाल केली. सामन्याच्या ३३ व्या षटकात ओ’केफी याने भारताच्या तीन फलंदाजांना चालते केले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात केएल राहुल (६४) झेलबाद झाला. त्यानंतर रहाणे स्लिपमध्ये झेलबाद झाला. पाठोपाठ आर.अश्विन(१) शॉर्ट लेगवर झेलबाद झाला. जयंत यादवचा(०) यष्टीरक्षक पीटर हँड्सकोम्ब अप्रतिम स्टम्पिंग घेतला आहे. दुसऱया सत्रात भारत पूर्णपणे बॅकफूटवर आला. कांगारुंनी भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवली. ओ’केफेला चांगला सुर गवसल्याचे दिसत असतानाही जडेजाने मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट दिली. अखेरीस उमेश यादवलाही स्वस्तात बाद करून ओ’केफेने ३३ धावांत ६ विकेट्स घेण्याची त्याची सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.

फलंदाजांकडून घोर निराशा
कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी देखील कमाल केली. उमेश यादवने चार बळी घेत ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला होता. तर फिरकीपटू अश्विनने तीन आणि जडेजाने दोन फलंदाजांना माघारी धाडले. मॅट रेनशॉचे झुंजार अर्धशतक तर मिचेल स्टार्कची झंझावती फलंदाजी यामुळेच ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ९४ षटकांत ९ बाद २५६ अशी धावसंख्या रचता आली. मात्र कसोटीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या चाहत्यांची काही अंशी निराशाच झाली. भारतीय फलंदाजांनी देखील प्रचंड निराश केले. गहुंजे येथील मैदानावर हा पहिलाच कसोटी सामना असल्याने खेळपट्टीचा स्वभाव कसा राहील, याचीच उत्कंठा होती. रेनशॉ (६८) व स्टार्क (नाबाद ६१) यांच्या आत्मविश्वासपूर्ण खेळाचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे अन्य फलंदाज खेळपट्टीचे दडपण घेत बाद झाले. भारताकडून केवळ लोकेश राहुलने ६४ धावा केल्या. भारताच्या ८ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. अजिंक्‍य रहाणेच्या 13 धावा या भारतीय डावातील द्वितीय सर्वोच्च क्रमाकांच्या धावा ठरल्या.

ऑस्ट्रलियाकडे 298 धावांची आघाडी
भारतीय डाव 105 धावांत संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलियास 155 धावांची भक्कम आघाडी मिळाली. यानंतर पुढे खेळावयास सुरुवात केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात खराब झाली. आश्‍विन याने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (10 धावा – 6 चेंडू) व शॉन मार्श (0 धावा -21 चेंडू) यांना त्वरित तंबूत धाडत ऑस्ट्रेलियास धक्के दिले. धावफलकावर संघाच्या 25 धावा लागण्याआधीच त्यांचे दोन फलंदाज तंबूत परतले. सलामीवीर डेविड वॉर्नरला अश्विनने 10 धावांवर पायचीत केले. त्यानंतर शॉन मार्शला भोपळाही फोडू न देता अश्विनने पायचीत केले. त्यानंतर स्मिथला साथ द्यायला मैदानावर आलेले हॅन्ड्सकॉम्ब(19) आणि रेनशॉ(31) हे स्थिरावत आहेत असे वाटत असताना अनुक्रमे अश्विन आणि जयंत यादवने त्यांना बाद केले. सध्या कर्णधार स्मिथ (59) आणि मिचेल मार्श (21) धावांवर नाबाद असून ऑस्ट्रलियाकडे 298 धावांची आघाडी आहे. यामुळे आता ऑस्ट्रेलियाकडून भारतासमोर किती धावांचे आव्हान ठेवले जाते, याची उत्सुकता आहे.

अश्विनने मोडला कपिल देवचा विक्रम
भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आपल्या कारकीर्दीत नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत स्टार्कची विकेट घेऊन आणखी एका विक्रमाची नोंद केली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात अश्विनने यंदाच्या मोसमातील ६४ वी विकेट घेतली. माजी कर्णधार कपिल देव यांनी १९७९-८० मध्ये मायदेशात १३ कसोटी सामन्यांत ६३ विकेट्स घेतल्या होत्या. यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कपिल देव यांनी २२.३२ च्या सरासरीने घेतलेल्या २८ विकेट्सचा समावेश होता. अश्विनने हा पराक्रम केवळ १० कसोटी सामन्यांमध्येच मोडीस काढला आहे. अश्विनने एकाच हंगामात झालेल्या १० कसोटी सामन्यांमध्ये ६४ बळी घेण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अश्विनने ऑक्टोबर २०१६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांमध्ये २७ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने २८ विकेट्स आपल्या खिशात जमा केल्या आणि बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत ६ विकेट्स अश्विनने आपल्या नावावर केल्या. तर सध्या पुण्यात सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अश्विनने आतापर्यंत ६ विकेट्स घेतल्या आहेत. या मालिकेतील आणखी तीन सामने अद्याप शिल्लक आहेत.

कोहली १०४ कसोटीतील डावांनंतर शून्यावर बाद
विराट कोहलीचा गेल्या काही मालिकांमधील जबरदस्त फॉर्म पाहता शून्यावर बाद होण्याची नामुष्की त्याच्यावर आली नाही. पुण्याच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराटच्या कामगिरीने समस्त भारतीय चाहत्यांची घोर निराशा झाली. विराट गेल्या काही सामन्यांतील जबरदस्त फॉर्म या मालिकेतही कायम राखेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात मिचेल स्टार्कच्या चेंडूने विराटचा घात केला आणि तो शून्यावर बाद झाला. तो दोन वर्षाहून अधिक काळानंतर शून्यावर बाद झाला आहे. याआधी ७ ऑगस्ट २०१४मध्ये मँचेस्टर कसोटीतील पहिल्या डावात तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर तब्बल १०४ कसोटीतील डावांनंतर त्याच्यावर शून्यावर बाद होण्याची वेळ आली. पुणे कसोटीचा दुसरा दिवस कोहलीसाठी आतापर्यंत भारतात खेळलेल्या कसोटींपैकी सर्वात वाईट दिवस होता. या सामन्यात एकही धाव न काढता कोहली बाद झाला. भारतातील कसोटीमध्ये शून्यावर बाद होण्याची कोहलीची कारकिर्दीतील ही पहिलीच वेळ ठरली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारात शून्यावर आऊट होण्याची नामुष्की कोहलीवर 104 डावांनंतर आली. यापुर्वी 2014 मध्ये इंग्लंड मालिकेत कोहली शून्यावर बाद झाला होता. कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत आतापर्यंत कोहली 5 वेळेस शून्यावर बाद झाला आहे.