पुणे : आपला संघ ऑस्ट्रेलियाकडे कोणताही विशेष संघ म्हणून पाहत नसल्याचे विराट कोहलीने म्हटले आहे. ‘ज्याप्रकारे आपण दुस-या संघाविरोधातील सामन्यांच्या आधी तयारी करतो, त्याचप्रमाणे आम्ही या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहोत. आम्ही नेहमी विरोधी संघाच्या भक्कम आणि कमकुवत बाजूंवर चर्चा करुन त्याप्रमाणे प्लान आखतो. यावेळीदेखील आम्ही असेच करत असून यामध्ये काही नवीन नाही’, असे विराट कोहलीने सांगितले. विराट म्हणाला की, ‘आपल्यासाठी प्रत्येक सामना एक आव्हान असून, प्रत्येक मालिका आव्हानात्मक असते. ऑस्ट्रेलियासंबंधी आम्ही काही विशेष चिंता नाही करत आहोत. आम्ही विरोधी संघाचा आदर करतो, पण आम्ही आमच्या खेळण्याच्या क्षमतेवर आणि खेळावर लक्ष केंद्रित करतो. आमचं लक्ष ऑस्टेलिया संघावर नाही ही आमची सर्वात मोठी ताकद आहे. ज्याप्रमाणे दुस-या संघांविरोधात खेळण्याआधी आम्ही तयारी करतो तशीच तयारी आत्ता करत आहोत’. विराटने सांगितले की, ‘मी प्रत्येक मालिकेनंतर स्वत:ला पारखत बसत नाही. देशासाठी खेळणं आणि जिंकणं माझी प्राथमिकत आहे. मी दरवेळी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो ज्यामध्ये प्रशिक्षक अनिल कुंबळे महत्वाची भूमिका निभावतात. कर्णधाराचा प्रश्न येतो तेव्हा ती संघावर अवलंबून असते. संघाच्या कामगिरीवर कर्णधाराची यशस्वी कारकिर्द ठरते’.
अव्वल स्थानासह विशेष सन्मान पणाला
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या या मालिकेत आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतले अव्वल स्थानही पणाला लागले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सध्या भारत 121 गुणांसह पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया 109 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला 3-0 किंवा 4-0 असे हरवले, तर भारताला कसोटी क्रमवारीतले अव्वल स्थान गमवावे लागू शकते. त्यामुळे पुणे कसोटी जिंकून सुरुवातीलाच या मालिकेत आघाडी घेण्याचा टीम इंडियाचा इरादा राहील. भारतीय संघाने आगामी कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाला हरविल्यास टीम इंडियाला १० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस देखील मिळणार आहे. भारतीय संघ सध्या फॉर्ममध्ये असून, सलग १९ सामन्यांमध्ये विजयी ठरला आहे. मात्र, येत्या २३ तारखेपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध पुण्यात सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळविल्यास भारतीय संघाला १० लाख डॉलर मिळतील. कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखल्याबद्दल आयसीसीकडून टीम इंडियाला हे बक्षीस देण्यात येणार आहे. आयसीसीच्या मानांकनात सर्वोच्च स्थानी राहण्यासाठी आणि बक्षिसावर दावा सांगण्यासाठी १ एप्रिल २०१७ ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत भारताने विजय संपादन केल्यास टीम इंडिया सर्वोच्च स्थानी कायम राहून संघाला बक्षिसाच्या रकमेवर दावा करता येईल. यापूर्वी बक्षिसाची ही रक्कम पाच लाख डॉलर इतकी होती. मात्र, २०१५ पासून ही रक्कम १० लाख डॉलर इतकी करण्यात आली.