पुणे । भारताचा 19 कसोटी लगातार जिकण्याचा विजयी रथ ऑस्ट्रेलियाने पुणे कसोटीत थांबविला. तर ऑस्ट्रेलियाचा विजय हा गेल्या 13 वर्षांतील भारतीय भूमीवरील पहिलाच कसोटी विजय ठरला आहे. याआधी 2004 साली नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताला 342 धावांनी हरवले होते.2004 नंतर पुढच्या 11 कसोटींत 9 वेळा ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला तर दोन सामने अनिर्णित राहिले होते. पराभवांची ती मालिका स्टीव्हन स्मिथच्या टीमने मोडली. कांगारूंच्या या विजयामुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या मालिकेतली चुरसही आणखी वाढली आहे. पुण्यातील कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने 333 धावांनी दणदणीत पराभव केला. सामन्याच्या पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांची चांगलीच तारांबळ उडवली. त्यांच्या फिरकी मार्यासमोर भारतीय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. अवघ्या 105 धावांत भारताचा डाव गुंडाळला. दुसर्या डावात फिरकीला अनुकूल असलेल्या पीचवर टिच्चून फलंदाजी करण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसमोर होते. ते आव्हान त्यांनी सहज पेलले.
तब्बल 19 कसोटी अपराजित राहिल्यावर भारताला अखेर पराभवाची चव चाखावी लागली आहे. हैदराबाद कसोटीत बांगलादेशवरील विजयानंतर विराट हा भारतातर्फे सलग सर्वाधिक म्हणजे 19 सामने अपराजित राहणारा कर्णधार ठरला होता.विराटने माजी क्रिकेटपटू सुनील गावसकरांचा 18 कसोटी सामने अपराजित राहण्याचा विक्रम मोडला होता. पण हा विक्रम आणखी उंचावण्याची किमया विराटला साधता आली नाही.ऑगस्ट 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध गॉल कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर थेट फेब्रुवारी 2017 मध्ये पुणे कसोटीत ऑस्ट्रेलियाने
भारताला हरवले.
पुणे कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला दोन्ही डावांत मिळून केवळ 13 धावाच करता आल्या. या कसोटीच्या पहिल्या डावात तर कोहलीला भोपळाही फोडता आला नव्हता. मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये कोहलीची ही आजवरची सर्वात खराब कामगिरी ठरली आहे.विशेष म्हणजे कोहलीने पुणे कसोटीच्या दोन्ही डावात डावखुर्या गोलंदाजांना आपली विकेट बहाल केली. पहिल्या डावात मिचेल स्टार्कनं कोहलीला माघारी धाडलं. तर दुसर्या डावात स्टीव्ह ओ’कीफने विराटला चकवले.