लंडन । चॅम्पियन ट्रॉफित भारतीय संघ, इंग्लंड व आफ्रिका या संघानी दमदार सुरवात केली आहेे.या संघानी ऑस्ट्रेलिया संघापेक्षा चांगली फलंदाजी व गोलंदाजीची क्षमता असल्याचे शेन वॉर्न म्हणाला.व्टिट या त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियन संघाच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वार्नने ट्विटमध्ये लिहिलंय की, दक्षिण आफ्रिका, भारत आणि इंग्लंड या संघांमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत दिसते आहे. तर पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघ कमकुवत दिसत आहेत. दोन्ही संघानी फलंदाजीवर अधिक भर देण्याची गरज आहे.
मिनी विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणार्या या स्पर्धेतील साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया सध्या बॅकफूटवर आहे. ‘अ’ गटातील गुणतालिकेत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध दोन सामने खेळले असून, दोन्ही सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. परिणामी ऑस्ट्रेलियाच्या खात्यात प्रत्येक सामन्यासाठी 1 याप्रमाणे 2 गुण जमा आहेत. ऑस्ट्रेलिया सध्याच्या घडीला ‘अ’ गटात दुसर्या स्थानावर असला तरी त्यांच्यासाठी या स्पर्धेत टिकून राहणे कठीण झाले आहे. कारण या गटात यजमान इंग्लंडचा संघ चागली कामगिरी करत असून, ऑस्ट्रेलियाची अखेरच्या सामन्यात त्यांच्याशी गाठ पडणार आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया कशी कामगिरी करणार यासोबतच न्यूझीलंडचा उरलेल्या तीन सामन्यातील कामगिरीवर ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील भविष्य अवलंबून असणार आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडचे स्पर्धेत तीन सामने बाकी असल्यामुळे सध्याच्या घडीला ‘अ’ गटात या दोन्ही संघामुळे ऑस्ट्रेलियाला साखळी सामन्यातूनच घरचा रस्ता पकडावा लागू शकतो.