ऑस्ट्रेलियाला पडणारी दुख:द स्वप्ने

0

मुंबई । हरमनप्रीत कौरच्या नाबाद 171 धावांच्या खेळीमुळे, विजयासाठी 42 षटकांमध्ये 283 धावा करण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियाला दडपणामुळे पेलवता आले नाही. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघावरचा दबाव कायम राखत 36 धावांनी विजय मिळवत दुसर्‍यांदा आयसीसी महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. याआधीही 2005 मध्येही भारताने अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून विश्‍वचषक जिंकला होता. आता भारताने ऑस्टेे्रलियाला अंतिम फेरीच्या आधीच घरचा रस्ता दाखवत त्या पराभवाचा हिशेब चुकता केला. गुरुवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताची फलंदाज हरमनप्रीत कौर ऑस्ट्रेलियन संघासाठी एक दुख:द स्वप्न ठरली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटला भारतीय क्रिकेटकडून मिळालेले हे तिसरे भयावह स्वप्न आहे. सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्षण आणि आता हरमनप्रीत कौर अशी त्या स्वप्नांची नावे आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या झंझावती खेळीमुळे हरमनप्रीत महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी पाचव्या क्रमांकाची फलंदाज ठरली आहे. हरमनप्रीतच्या पुढे बेलिंडा क्लार्क (नाबाद 229), दीप्ती शर्मा (188), चमारी अट्टापट्टू (नाबाद 178) आणि शार्लेट एडवर्ड (नाबाद 173 ) आहेत. 23 जुलैला भारत आणि इंग्लड यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. इंग्लडने याआधी तिनवेळा विश्‍वचषक स्पर्धा जिंकली आहे. पण यावेळी साखळी लढतीत भारताने इंग्लंडला हरवले होते. त्यामुळे दोन्ही संघाकडे समान संधी आहे.

वॉर्नला सचिन स्वप्नात दिसायचा
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज शेन वॉर्नने 1998 मध्ये म्हटले होते, आता स्वप्नातही सचिनची भिती वाटते. सचिनच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे भारताने 1998 मध्ये ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंडचा समावेश असलेली तिरंगी मालिका जिंकली होती. वॉर्नने एका मुलाखतीत खुलासा केला होता, सचिन त्याच्या स्वप्नात येतो आणि त्याच्या डोक्यावरुन समोरील साईटस्क्रिनवर षटकार ठोकतो म्हणून. अर्थात नंतर वॉर्नने मी गमतीने असे बोललो होतो, असा स्वत:चा बचाव केला. पण त्या मालिकेत सचिनने केलेली फलंदाजी पाहता, केवळ ऑस्ट्रेलियासाठीच नाही तर न्यूझीलंडसाठी ती दुख:द स्वप्न होती.

लक्षणची धमाल
साधारणपणे 16 वर्षांपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विश्‍वविजेता आणि कसोटीमध्ये नंबर वन होता. सलग 15 कसोटी सामने जिंकून ऑस्ट्रेलिया भारत दौर्‍यावर आली होती. मुंबईतील कसोटी सामना 10 विकेट्सनी जिंकून ऑस्टे्रलियाने सलग 16 कसोटी सामने जिकंले. कोलकात्यातील दुसर्‍या कसोटीत लक्ष्मणने वेरी वेरी स्पेशल इंनिग खेळली.

तो टी शर्ट अजून आहे
हरमनप्रीतचा जन्म झाल्यावर तिचे वडील हरमिंदरसिंग तिच्यासाठी एक टी शर्ट घेऊन आले होते. त्या टी शर्टवर एका फलंदाजांचे चित्र आहे. त्या फलंदाजांच्या खाली गुड क्रिकेट असे लिहीले आहे. हरमिंदरसिंग यांनी तो टी शर्ट अजून सांभाळून ठेवला आहे. त्या तुफानी खेळीनंतर हरमिंदरसिंग यांना त्या टी शर्टची आठवण झाली. कपाटात ठेवलेला तो टी शर्ट एका वडिलांनी बाहेर काढून हळूवारपणे त्याच्यावर हात फिरवला.

मुलांसोबत केला सराव
ज्या पंजाबात एका मुलीला गर्भातच मारले जाते तिथे आज हरमनप्रीतच्या खेळीचा जल्लोष साजरा होतोय. पण हरमनप्रीतचा इथपर्यंतचा प्रवास काटेरी होता. हरमनप्रीतला घेऊन हरमिंदरसिंग मैदानावर जाताच तिथे खेळत असलेली मुले शिवीगाळ करायचे .पण हुरंदरसिंग यांनी कधीच आपला तोल ढळू दिला नाही. हरमनप्रीतने क्रिकेट खेळावे म्हणून कुटुंबियानी सर्वस्व पणाला लावले होते.

1 वीरेंद्र सेहवाग हा हरमनप्रीत कौरचा आदर्श आहे. सेहवागप्रमाणे हरमनप्रीतही मैदानावर बॉल देखो और हिट करो हा फॉर्म्युला वापरते. उपांत्य फेरीत तीने केवळ 26 चेंडुमध्ये अर्धशतक ते शतक अशी मजल मारली.

2 परदेशात टी 20 क्रिकेट लीग खेळणारी हरमनप्रीत भारताची पहिली (महिला-पुरुष) क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियातील बीग बॅश लीगसाठी तीन संघांपैकी हरमनने सिडनी थंडर्स संघाला पसंती दिली.

3 आता कुठलीही मुलगी गर्भातच मारली जाणार नाही अशी आशा हरमनप्रीतकौरच्या आईने व्यक्त केली. माझ्या मुलीप्रमाणे त्याही देशाचे नाव मोठे करतील असे सांगितले.

आता हरमनप्रीत कौर
सचिन, लक्ष्मणनंतर आता हरमनप्रीत कौर ऑस्ट्रेलियाला भयावह स्वप्न ठरली आहे. खराब सुरुवातीनंतर हरमनप्रीतने 115 चेंडूत 20 चौकार आणि 7 षटकार ठोकत तुफानी खेळी केली. सुरुवातील सावध खेळणार्‍या हरमनप्रीतने कर्णधार मिताली राज (36) आणि दीप्ती शर्मा (25) दोन महत्वाच्या भागिदार्‍या केल्या.