ऑस्ट्रेलिया मीडिया आगीत तेल ओतत आहे-मिशेल स्टार्क

0

मेलबोर्न । ऑस्ट्रेलियन मीडिया विराट कोहलीची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करून मैदानाच्या आत व बाहेरच्या आगीत तेल ओतत आहे. या शाब्दिक हल्ल्यामागे मालिका गमावण्याचीच भीती असल्याचा आरोप जखमी वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क याने केला. त्याच्या पायाला स्ट्रेस फ्रॅक्चर होताच दौरा सोडून स्टार्क मायदेशी परतला आहे. तो म्हणाला, “आमच्या संघाच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघाने शाब्दिक हल्ल्याला बळ दिले.

आम्ही आधीसारखेच क्रिकेट खेळत आहोत. भारतीय संघाला सुरुवातीला आमच्या तुलनेत वरचढ समजण्यात आले. पुण्यात पहिल्याच सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने भारत बॅकफूटवर आला होता. भारतात आम्ही भारताला पराभूत केल्यामुळे यजमान संघात भीती पसरली. त्यातच शाब्दिक हल्ले करणे बचावात्मक धोरण होते. दुसर्‍या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवून मालिका बरोबरीत आणली, हा भाग वेगळा.” ऑस्ट्रेलियन मीडियाने काल विराट कोहलीची तुलना डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी करून मैदानाच्या आत तसेच बाहेरच्या आगीत तेल ओतले.