ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला भीषण आग; पाच जण ठार

0

नवी मुंबई: धुळे येथील केमिकल कंपनीत स्फोट झाल्याने १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला आज मंगळवारी सकाळी लागलेल्या भीषण आगीत ५ जण मृत्यू झाला आहे. तर, तिघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन अग्निशमन दलाच्या जवानांचा समावेश असल्याचे समजते. प्लांटमध्ये आणखीही काही लोक अडकून पडल्याची भीती असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ही आग लिक्विड गळतीमुळे लागली आहे. आग लागली तेव्हा रात्रीपाळीचे कामगार कामावर होते. आग लागल्यानंतर तिथं मोठा गोंधळ उडाला. बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असतानाच अनेक कामगार जखमी झाले. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला.

या आगीमुळे परिसरात घबराट पसरली असून आजूबाजूला असलेल्या वसाहतींमधील रहिवासी सुरक्षित स्थळी जाऊ लागले आहेत. आगीची माहिती मिळताच, ओएनजीसी, जेएनपीटी फायर ब्रिगेड, तसेच द्रोणागिरी, पनवेल आणि नेरुळ नेरूळ इथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत. संततधार पावसामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत आहेत.

गेल्याच महिन्यात या प्लाटमध्ये स्फोट होऊन आग लागली होती. हा प्लांट मोठा आणि जुना असून आतील सामग्रीही जुनी झालेली आहे. यामुळे या प्लांटला गळतीचा धोका नेहमीच राहिलेला आहे. या आगीमुळे पुन्हा एकदा या प्लांटचा, कामगारांचा आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.