ओखा इफेक्ट : पुणे, पिंपरी-चिंचवडवरही तुषारवर्षाव!

0

पुणे : पूर्व-मध्य भागावर ओखी चक्रीवादळ घोंगावत असतानाच, त्याचा फटका पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालाही बसला आहे. या वादळामुळे मुंबईसह पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात पावसाने हजेरी लावून शहरातील गारठा वाढविला. पुढील दोन दिवसही पावसाचे आहेत, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आलेली आहे. अरबीसमुद्रावर घोंगावणारे ओखी चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने निघाले असून, त्याचा परिणाम पुणे व पिंपरी-चिंचवडच्या हवामानावर झालेला आहे, असेही सांगण्यात आले. दरम्यान, काल रात्री या दोन्ही शहरात पावसाने हजेरी लावली. सकाळीही काही भागात तुषारवर्षाव होत होता. ऐन हिवाळ्यात आलेल्या या पावसामुळे शहरांतील गारठा वाढला असून, जनजीवन विस्कळीत झाले होते. पुढील चोवीस तासांत गुजरातसह महाराष्ट्राच्या समुद्र किनार्‍याला हे चक्रीवादळ व्यापून टाकेल, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

मुंबईत मुसळधार; वादळाची सुरतच्या दिशेने वाटचाल
ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी सकाळी मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. सतर्कतेच्या इशार्‍यामुळे मंगळवारी मुंबईतील शाळांना सुट्टी देण्यात आली होती. अनेकांनी कामावर न जाता घरीच थांबणे पसंत केले. हे चक्रीवादळ आता गुजरातच्या दिशेने सरकत असून, ते आता सुरत किनार्‍यावर धडकणार आहे. त्यामुळे गुजरात किनारपट्टीवरही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या चोवीस तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ ताशी 18 किलोमीटर वेगाने ईशान्यकडे सरकत आहे. मुंबईपासून 420 किलोमीटर अंतरावर असलेले हे वादळ हळूहळू गुजरातकडे सरकत असून, मंगळवारी मध्यरात्रीपर्यत ते सुरतजवळ स्थिरावण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

सतर्कतेचा इशारा
ओखी चक्रीवादळामुळे 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत समुद्रात पाच मीटरपेक्षा उंच लाटांची भरती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रकिनार्‍याजवळील परिसरात राहणार्‍या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच खबरदारीच्या उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत.