ओखीचा धोका टळला!

0

मुंबई बाहेरुन वादळ गुजरातच्या दिशेने

मुंबई : तामिळनाडू, केरळमध्ये विध्वंस करून आता अरबी समुद्रात आलेले ओखी चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने रवाना झाले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीचा धोका कमी झाला आहे.ओखी चक्रीवादळाचा राज्याला असणारा धोका आता टळला असून, या चक्रीवादळाने आता दक्षिण गुजरातकडे आपला मोर्चा वळविला आहे. राज्याच्या किनारी भागाच्या अत्यंत जवळ हे चक्रीवादळ असल्याने त्या सोबत बाष्पयुक्त ढग घेऊन ते आले. यामुळेच गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकण, मुंबई, ठाणे, पुण्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी कोकणसह मुंबईत हलक्या पावसाचा अंदाज असून गुरुवारी 7 डिसेंबर पासून राज्यातील ढगाळ वातावरण हळूहळू निवळायला सुरूवात होणार ओखी चक्रीवादळ मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर घोंघावत असल्याने वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबईत आज सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. यामुळे ठिकाठिकाणी रस्तेवाहतूक मंदावली होती. पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, वार्‍यामुळे माळशेज घाटात झाडे कोसळली. दरम्यान, तमिळनाडू आणि केरळच्या किनारपट्टीपासून ते महाराष्ट्रापर्यंत धडकलेल्या ओखी चक्रिवादळाने देशभरात घातलेल्या तांडवात 39 जणांनी प्राण गमावले आहेत. तर देशभरातील 167 मच्छिमार अजूनही बेपत्ता आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिल्याचे पीटीआयने स्पष्ट केले आहे.

10 वर्षांनंतर डिसेंबरमध्ये पाउस
मुंबईसह कोकण किनारपट्टीवर या ओखी वादळाचा परिणाम जाणवला. पनवेलजवळ एक्सप्रेसवेवर वादळी वार्यासह गारपीट सुरु झाली. मुंबईसह उपनगरात पाऊस सुरु आहे. गेल्या 24 तासांत 24 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या 10 वर्षांनंतर डिसेंबरमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. समुद्रात 4.35 मीटर लाटा उसळणार असून ताशी 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी समुद्रकिनारी न जाण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापनाने केले आहे.

उत्तर महाराष्ट्राला फटका
वादळाचा प्रभाव म्हणून राज्याच्या उत्तर भागाला फटका बसला आहे. मुंबईसह ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांत पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होईल, असे हवामानशास्त्र खात्याने म्हटले आहे. त्याच वेळी देशाच्या उत्तरेकडून जोरदार थंड वारे राज्यात धडकण्याची शक्यता असून त्यामुळे पारा घसरण्याची शक्यता आहे.

सुरतमधील 63 गावांमध्ये हायअलर्ट
– सुरतमधील समुद्र किनार्यावरील 63 गावांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. अति संवेदनशिल भागात एनडआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. एसएमसी, पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.