मुंबईसह राज्यावरील संकट टळल्याची गूड न्यूज
पुणे : पूर्वमध्ये आणि लगतच्या अग्नेय अरबी समुद्रावर असलेले अतितीव्र चक्रीवादळ ओखी आता पूर्वमध्य अरबी समुद्रावर असून, ते वायव्य दिशेकडे सरकले आहे. त्याचे मुंबईपासूनचे अंतर अंदाजे 670 किलोमीटर आहे. त्याची तीव्रता कमी होऊन त्याचे रुपांतर अतिकमी दाबाच्या क्षेत्रात होईल. ते दक्षिण गुजरात आणि लगतच्या उत्तर महाराष्ट्राच्या किनार्यावर 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत पोहोचेल. या चक्रीवादळामुळे कोकण, मुंबईसह गुजरातमध्ये समुद्र खवळलेला राहील. येत्या 24 तासांत दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, या वादळामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील वातावरण बदलले असून, काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.
आज, उद्या राज्यात पाऊस
सोमवारी दुपारी चार वाजता हे चक्रीवादळ सुरतपासून अंदाजे 770 किलोमीटर अंतरावर होते. तसेच वेगाने गुजरातकडे सरकत होते. या वादळामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात सोमवारी सकाळी वारे ताशी 110 ते 120 किमी वेगाने वाहत होते. रात्री त्यांचा वेग मंदावला तर 5 डिसेंबरला त्यांचा वेग आणखी कमी होऊन ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली. या वादळामुळे उत्तर व दक्षिण कोकणात काही ठिकाणी सोमवारी हलका पाऊस झाला असून, पुढील 24 तासांत उत्तर कोकणात बहुतांश ठिकाणी, दक्षिण कोकण व गोव्यात बर्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6 डिसेंबरला कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात पाऊस पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली. 5 डिसेंबरला दक्षिण कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर व किनारपट्टीलगत ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्राच्या लगतचा समुद्र खवळलेला राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबईचा धोका टळला!
ओखी हे चक्रीवादळ आता दक्षिण गुजरातच्या दिशेने वेगाने सरकत असल्याने त्याची तीव्रता कमी होऊ लागली होती. मुंबईपासून अंदाजे 670 किमी अंतरावरुन ते जात असल्याने मुंबईत पाऊस झाला तरी त्याचा धोका आता टळला आहे. हे चक्रीवादळ साधारणपणे ताशी 13 किमी वेगाने पुढे सरकत होते. 6 डिसेंबररोजी ते गुजरात व उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात ते प्रवेश करेल, त्यावेळी त्याची मुंबईवरील तीव्रता खूपच कमी झालेली असेल.
– डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी, वरिष्ठ हवामान शास्त्रज्ञ