जळगाव । तामिळनाडू, केरळमध्ये विध्वंस करून अरबी समुद्रात आलेले ‘ओखी’ चक्रीवादळ आता महाराष्ट्रात धडकले आहे. शिवाय याची वाटचाल सुरतच्या दिशेने सुरू झाली आहे. ओखी चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण राज्यात तर जाणवतच आहे, शिवाय याचा परिणाम जळगावकरांनाही जाणवत आहे. मंगळवारी ओखीचा परिणाम म्हणून दिवसभर ढगाळ वातावरण होते, तसेच याचा विपरीत परिणाम जनजीवनावर दिसून आले. लहान मुलं, वृध्दांना आरोग्याच्या समस्या ढगाळ वातावरणामुळे जाणवल्या. वादळाचा प्रभाव म्हूणन जिल्ह्याभरात ढगाळ वातावरणामुळे पावसाच्या तुरळक सरीही कोसळल्या. पुढील काही दिवस ओखी चक्रीवादळाचा प्रभाव कायम असणार असून संपूर्ण राज्यावर याचा विपरीत परिणाम जाणवणार आहे.
तुरीचे पीक धोक्यात
ढगाळ वातावरणामुळे खरीप हंगामातील पिकांसह रब्बी हंगामातील पीके संकटात सापडले आहे. खरीप हंगामातील तुरीच्या पीकांना ढगाळ वातावरणाचा सर्वाधीक फटका बसणार आहे. कारण तुरीच्या पीकावर अळीचा प्रादुर्भाव याच्यामुळे वाढणार आहे. तुरीचे पीक आता चांगला फुलोर्यात असून शेंगाही लागलेल्या आहेत. ढगाळ वातावरणामुळे अळींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मोठे नुकसानीला शेतकर्याला सामोरे जावे लागणार आहे. गहू, हरभरा आदी पिकांवरही याचा विपरीत परिणाम
जाणवणार आहे.
शेतकरी संकटात
बोगस बीटी बियाण्यामुळे कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. बोंडअळीमुळे शेतकर्यांना हातातील पिक उपटून फेकण्याची वेळ आली आहे. शेतकर्यांनी कपाशी उपटायला सुरुवातही केली आहे. बोंडअळीमुळे शेतकरी आधीच संकटात असतांना ओखी चक्रीवादळाने वातावरणातील बदलामुळे तयार झालेल्या ढगाळ वातावरणाने त्यात अधीकच भर पडली आहे. ढगाळवातावरणामुळे सर्वच पिकांवर अळीचा प्रादुर्भाव होणार आहे.