पुणे । जळगाव येथील के. सी. ई. सोसायटी संचलित मु. जे. महाविद्यालयामधील ओजस्विनी ललितकला/दृश्यकला विभागात फाउंडेशन ते मास्टर डिग्रीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचे स्वरुप कला प्रदर्शन 2017 हे पुणे येथे होत आहे. 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान शिवाजीनगर येथील जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व रंगमंदिरात हे प्रदर्शन होईल. जळगावमधील विद्यार्थ्यांचे इतर ठिकाणच्या महानगरात अशा प्रकारे कलाप्रदर्शन होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
के. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ञ, प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व प्राचार्य डॉ. यू. डी. कुलकर्णी यांच्या पाठबळामुळे हे प्रदर्शन प्रतिष्ठीत अशा बालगंधर्व कलादालनात होत असल्याची माहिती ओजस्विनीचे प्राचार्य अविनाश काटे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार (दि. 21) सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर आणि जगविख्यात चित्रकार रवी परांजपे यांच्या उपस्थितीत होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मु. जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. कुलकर्णी असतील. या प्रदर्शनाचा समारोप गुरूवारी (दि. 24) दुपारी 2 वाजता पुण्यातील ज्येष्ठ संपादक विजय बाविस्कर व दिशा अॅडचे संचालक रवींद्र देशमुख यांच्या उपस्थितीत होईल.
प्रदर्शन आयोजनाच्या मागील भूमिका
ओजस्विनी ललितकला/दृश्यकला महाविद्यालयात फाउंडेशनपासून तर पदव्युत्तर एम. एफ. ए. पर्यंत अभ्यासक्रम शिकवले जातात. या अभ्यासक्रमासाठी देशभरातून विद्यार्थी प्रवेश घेतात. ललितकला/दृश्यकला प्रकारात कागद, कापड (कॅन्व्हास) या पृष्ठभागासह इतरही अनेक माध्यमांवर विद्यार्थी चित्रांचे अविष्कार पेन्सिल, चारकोल, जल, तैल, पोस्टर, अॅक्रेलिक, मिक्समीडीया, इंक आदी प्रकाराच्या रंगातून साकारतात. अशाच प्रकारच्या अभ्यासातून विविध क्षेत्रातील कलाकार तयार होतात. आज विद्यार्थी दशेत असलेल्या या होतकरू कलाकारांना आपल्या चित्रांचे प्रदर्शन महानगरात मांडून कौतुकाची थाप व स्वावलंबी जीवन जगण्याकरीता एक व्यावसायिक व्यासपीठ मिळविण्याची संधी ओजस्विनी महाविद्यालयाने मिळवून दिली आहे. शिक्षण घेत असताना आपणही समाजाचे देणं लागतो या समर्पित भावनेतून कलाकारांनी दृश्यकलेची निर्मिती करावी आणि सामान्य लोकांच्या रंजनातून लोकशिक्षण करावे हाच या प्रदर्शन आयोजनामागील हेतू आहे. या प्रदर्शनातील विविध चित्रांच्या माध्यमातून नागरीकांना निश्चित, असा संदेश दिला जाणार आहे. कलेची विविध रुपे या प्रदर्शनातून प्रगट होतील.
निसर्गचित्र, रिअल लाईफ चित्रे पाहण्याची संधी
या प्रदर्शनात कॅन्व्हासवर ऑईल, पेस्टल, वॉटर, इंक आदी रंगमाध्यमातील जवळपास 108 चित्रे आहेत. त्यात व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, रिअल लाईफ, अध्यात्म, कॅलिग्राफी, कंम्पोझीशन, पिक्टोरीअल, क्रिएटीव्ह आदी प्रकारातील चित्रे आहेत. ही चित्रे प्रेक्षकांना पाहता येतील आणि योग्य ते मूल्य देऊन खरेदीही करता येतील. चार दिवसांच्या या प्रदर्शनात दुपारच्या सत्रात काही मान्यवर कलावंत विविध प्रकारच्या कलांचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. या प्रदर्शनाला पुण्यातील हौशी कलाकार, रसिक आणि कला महाविद्यालयांचे विद्यार्थी यांच्यासह खान्देशी मंडळींनी आवर्जून भेट द्यावी. आपल्या भागातील विद्यार्थ्यांच्या कौतुकाची ही संधी अनुभवावी, असे आवाहन प्राचार्य अविनाश काटे यांनी केले आहे.