ओजस, श्रुती, नीलांश, सखी अजिंक्य

0

मुंबई । नाशिक जिल्हा कॅरम संघटनेच्या वतीने बहुउद्देशीय मंडळाच्या सहकार्याने नानासाहेब महाले यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या 53 व्या सब जुनिअर महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या ( 12 वर्षाखालील ) कॅडेट मुलींच्या गटात ठाण्याच्या सखी दातारने आपल्याच संघातील सहकारी मधुरा देवळेलला अंतिम सामन्यात 25-0,25-4 असे सहज पराभूत केले आणि सलग दुसर्‍यांदा या गटाचे विजेतेपद पटकाविले. मुलांच्या ( 12 वषार्ंखालील ) कॅडेट गटात मुंबईच्या नीलांश चिपळूणकरने प्रतिस्पर्धी मुंबईच्या अनिरुद्ध चव्हाणला अंतिम सामन्यात 18-5,8-11 व 22-0 अशा तीन सेटमध्ये मात दिली. 14 वर्षांखालील मुलांच्या सब जुनिअर गटामध्ये मुंबईच्या ओजस जाधवने मुंबईच्याच सुजल गायकवाडवर अंतिम फेरीतच्या लढतीमध्ये 18-7,11-6 अशी मात केली.

मुलींच्या 14 वषार्ंखालील सब जुनिअर गटामध्ये अंतिम फेरीमध्ये पालघरची श्रुती सोनावणेने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुंणवर 23-0,8-6 व 15-5 असा विजय नोंदवला. विजेत्यांना प्रमुख अतिथी डॉ. जयप्रकाश हुबले, उपसंचालक नाशिक विभाग (महाराष्ट्र शासन), नगरसेविका छाया देवांग व दिलीप देवांग यांच्या शुभहस्ते चषक व प्रावीण्य प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र कॅरम संघटनेचे सहसचिव संतोष चव्हाण, प्रमुख पंच परविंदर सिंग, सहाय्यक प्रमुख पंच योगेश फणसाळकर, जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष आनंद खरे, सचिव अशोक कचरे उपस्थित होते.