ओझर: अष्टविनायकांतील एक प्रमुख तीर्थ असलेल्या श्री क्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपती मंदिरात सोमवारी २७ रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत श्रींच्या मुकुटावरील अंदाजे एक ते दीड किलो चांदीचा मुलामा असलेली छत्री व तिजोरीतील एक हजार रुपये चोरीस गेले आहे. ८० ते ९० हजारांचा ऐवज चोरीला गेले आहे.
लॉकडाऊन काळात मंदिर बंद राहणार असल्याने खबरदारी म्हणून लॉकडाऊन होण्यापूर्वी देवस्थानने अगोदरच श्रींचे सर्व सुवर्णालंकार बँक लॉकरमध्ये सुरक्षित ठेवले होते. तसेच लॉकडाऊनपूर्वी तिजोरी उघडून त्यामध्ये असणारी रक्कम बँक खात्यात वर्ग केल्यामुळे या घटनेत मोठा आर्थिक अनर्थ टळला असे श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे सांगण्यात आले आहे. मंदिरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये दोन धष्ट पुष्ट व्यक्तींनी मंदिरात प्रवेश केल्याचे दिसत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना, पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी भेट दिली असून अधिक तपास ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या घटनेमुळे जुन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे.