ओझे कमी करण्यासाठी अर्धवार्षिक पुस्तके तयार करावी

0

– विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे मत
– राष्ट्रीय शिक्षण संशोधन संस्थेने केलेल्या आवाहनावरून केल्या सूचना

मुंबई – कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचा प्रश्न सर्व स्तरावर चर्चिला जात असून हे ओझे कमी करण्यासाठी अर्धवार्षिक पुस्तके तयार करावीत, अशी सूचना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण संशोधन संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देताना त्यांनी ही सूचना केली आहे.

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात एनसीईआरटीने देशभरात जाहिरात प्रसिद्ध करून दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. त्यानुसार विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षाच्या अभ्यासक्रमाचे पुस्तक देण्याऐवजी अर्धवार्षिक अभ्यासक्रम ठरवून केवळ त्याच अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करावीत, अशी सूचना करणारे पत्र एनसीईआरटीला पाठवले आहे.

अर्धवार्षिक पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे वजन काही अंशी कमी होण्यास निश्चित मदत मिळू शकेल असेही त्यांनी म्हटले आहे. देशातल्या अनेक शाळांमध्ये तिमाही चाचण्या, सहामाही परीक्षा आणि वार्षिक परीक्षा असा कार्यक्रम असतो. त्या अभ्यासक्रमांवर आधारित परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांना उर्वरित अभ्यासक्रमांची पुस्तके ही शाळेत न्यावी लागतात. त्यामुळे एनसीईआरटीने याबाबत सकारात्मक विचार करावा, असेही मुंडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.