बोदवड । तालुक्यात पाणीपुरवठा करणारी ओडीए योजना वीज बिल थकल्यामुळे बंद पडली आहे. यासाठी कारणीभूत असलेली थकबाकी ही ग्रामपंचायतींमुळे निर्माण झाली आहे. वास्तविक पाहता गावांमधून जमा केलेल्या पाणीपट्टीतून 80 टक्के रक्कम ओडीएकडे भरणा करायला हवी परंतु जमा झालेल्या कराचा भरणा न करता इतरत्र वापरला जातो त्यामुळे ही थकबाकी वाढते व वीजपुरवठा बंद केला जातो. त्यामुळे नागरिकांचे हाल होत असतात. या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी कोल्हाडी येथील रवींद्र बावस्कर यांनी केली आहे.
मोर्चा काढून व्यक्त केला संताप
यावेळी गटविकास अधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत बावस्कर यांनी गावातून कररुपाने जमा केलेल्या रकमांचा भरणा ओडीएचे खाती न भरता इतर कामांवर खर्च केला. याची चौकशी करावी, अशी मागणी केली. तसेच या सर्व प्रकारात दोषी माजी सरपंच, विद्यमान सरपंच, ग्रामसेवक तसेच ग्रामसेवकांचे अहवाल तपासणारे ग्रामविस्तार अधिकारी यांच्यावर अपहार केल्याची कायदेशिर कारवाई करावी. अशा आशयाची या तक्रारीच्या प्रती मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवली आहे. दरम्यान , 15 दिवसांपासून पाणीपुरवठा खंडीत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे येथील नगरपंचायतीवर मोर्चा काढून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. शहरात पाणी पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले असल्याचे नगरपंचायतीतर्फे सांगण्यात आले.