राज्यातील दुर्मीळ उदाहरण : 9 महिने ते 15 वयोगटातील बालकांना लाभ देण्याबाबत आवाहन
चाळीसगाव- तालुक्यातील ओढरे येथील जिल्हा परीषद आरोग्य विभागातील शिवदास राठोड यांच्या मातोश्री स्व.हिरीबाई भावसिंग राठोड ह्यांच्या दशक्रियाविधी निमित्ताने तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे ह.भ.प.संजय राठोड महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. ही संधी साधून तळेगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तथा रोटरी मिलेनियम अध्यक्ष डॉ.प्रमोद सोनवणे यांनी अर्धा तास गोवर-रूबेला या विषयावर प्रवचनरूपी व्याख्यान दिले. गोवर रूबेला लसीकरण मोहिमेत 9 महिने ते 15 वयोगटातील बालकांना लाभ देण्यासह जनजागृती करण्याचे आवाहन डॉ.प्रमोद सोनवणे यांनी उपस्थितांना केले.
डॉ.सोनवणेंचा जनसेवेचा वसा
डॉ.सोनवणे हे वैद्यकीय अधिकारी आहेत शिवाय राजपत्रीत पद असूनही निव्वळ खरीखुरी जनसेवा करण्याचा वसा लक्षात घेऊन व प्रसंगावधान साधून स्वतः ह.भ.प.ची भूमिका घेऊन त्यांनी गोवर-रूबेला लसीकरण व आरोग्यविषयी कीर्तन करून जनजागृती करण्याचे संपूर्ण महाराष्ट्रातील हे एकमेव दुर्मीळ उदाहरण असल्याची प्रतिक्रिया व गौरवोद्गार कीर्तनकार संजय महाराज यांनी काढले. यावेळी डॉ.प्रमोद सोनवणे यांचा ओढरे गावातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परीषद शाळेतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. हा उपक्रम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस कमलापुरकर व जिल्हा परीषद सदस्य अतुल देशमुख व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.देवराम लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यावेळी जिल्हा परीषद शाळेतील उपशिक्षक आबासाहेब कच्छवा, डॉ.आशा राजपूत, आरोग्य सहाय्यक एल.सी.जाधव, विजय देशमुख, मोहन राठोड, नितीन तिरमले, बळीराम राठोड, ज्ञानेश्वर चव्हाण आदींसह भजनी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.