ओढरे येथे दोन तरुणांचा अकस्मात मृत्यू

0

चाळीसगाव। तालुक्यातील ओढरे येथे दोन तरुणांसह एका बैलाचे शुक्रवारी 25 रोजी दुपारी 4 वाजेदरम्यान आकस्मात मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. बळीराम पिता जाधव यांच्या शेताच्या बांधावर मृतदेह आढळून आले. शरीर काळे पडल्याने विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात असुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वीजेच्या धक्काने मृत्यु झाल्याचा अंदाज
योगेश प्रल्हाद राठोड (27), दत्तु रतन राठोड (28) व पांढर्‍या रंगाच्या बैलाचा मृतदेह आढळून आले आहे. गेल्या तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. पोळ्याला जोरदार पाऊस झाल्याने शेतीकामांना वेग आला आहे. दोघा तरुणांचे शरीर काळे पडले असल्याने त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला दोघे तरुण त्याठिकाणी काय करीत होते हे मात्र कळु शकले नसले तरी शरीर काळे पडल्याने विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला असावा अशी चर्चा परिसरात होती. वीज वितरण कंपनीच्या गलथाण कारभारामुळे निष्पाप तरुणांसह मुक्या प्राण्याचा जीव गेल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळा त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला विजय हरी राठोड यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन तपास हवालदार दिलीप रोकडे करीत आहेत.