ओढ्यांवरील अतिक्रमणे काढून टाका

0

यवत । दौंड तालुक्यातील यवत, कासुर्डी, भरतगाव, बोरीभडक, डाळींब, बोरिऐंदी, भांडगाव, खोर या गाव, परिसरातून जाणार्‍या ओढ्यांवर झालेली अतिक्रमणे त्वरीत काढून त्यांची खोली आणि रुंदी वाढवण्याचे काम हाती घ्यावे, अशी लेखी मागणी दौंड तालुका जलसाक्षरता समितीचे सदस्य अनिल गायकवाड यांनी दौंडचे तहसीलदार तथा जलसाक्षरता समितीचे अध्यक्ष बालाजी सोमवंशी यांच्याकडे केली आहे.

दौंड तालुका जलसाक्षरता समितिची बैठक नुकतीच दौंडचे तहसीलदार तथा समितीचे अध्यक्ष बालाजी सोमवंशी यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली. यावेळी गायकवाड यांनी सभेत विषय उपस्थित करीत लेखी निवेदन दिले. दौंड तालुक्याची भौगोलिक रचना विचारात घेता तालुक्याचा दक्षिणेकडचा संपूर्ण भाग जिरायती पट्टा म्हणून सुरुवातीपासूनच ओळखला जातो. त्यामुळे पावसाळ्याचा काही काळ वगळता या भागात जनावरांच्या चार्‍यासह, मानवी लोकवस्तीला पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवते.

…तर पाणीसाठा वाढेल
ओढ्यांकाठी असलेल्या शेतकर्‍यांनी पर्यावरणाचा कोणताही विचार न करता ओढा क्षेत्रात मोठी अतिक्रमणे करीत पूर्वीचे ओढ्यांचे क्षेत्र पूर्णता काबीज केले आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून पावसाळ्यात सह्याद्री पर्वताच्या असणार्‍या डोंगर (भुलेश्‍वर डोंगर) रांगातून वाहणारे पाणी साठवण्याची पूर्वीसारखी नैसर्गिक सोय उपलब्ध राहिली नसल्याने आणि ओढ्यांना लहान पाटाचे स्वरूप आल्याने मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाया जाते, असा आरोप अनिल गायकवाड यांनी दिलेल्या पत्रात केला आहे. या परिसरातील ओढ्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यास पावसाचे वाहून जाणारे लाखो लिटर पाणी जमिनीत मुरून परिसरातील विहिरी, विंधन वाचतील.