ओतूरची बाजारपेठ फुलली

0

ओतूर । गणेशोत्सवासाठी लागणार्‍या साहित्याने ओतूरची बाजारपेठ फुलली आहे. सजावटीच्या साहित्यांनी बाजार व्यापला असून आकर्षक मखर, सिंहासने, फुलांच्या माळा, बाप्पांसाठी मोत्यांच्या माळा, रंगीबेरंगी लाईटींगने बाजार झगमगत आहे. ग्रामीण भागासह शहरातील नागरिकांची खरेदीही सुरू झाली आहे.

इको फ्रेंडली मखर
आरास करण्यासाठी सजावट साहित्याची असंख्य व्हरायटी सध्या बाजारात उपलब्ध आहे. थर्माकोलची आकर्षक मखर, खांब, जाळी, फुलांच्या माळा, मण्यांच्या माळा, क्रेप रोल आदींनी बाजार फुलला आहे. खास लाईट इफेक्ट असणारी थर्माकोलचे मखर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. निसर्गप्रेमींसाठी खास इको फेंडली मखर, सिंहासने बाजारात दाखल झाली आहेत. लाकडी सिंहासने, नक्षीदार आरास यामुळे पर्यावरणपूरक सजावटीसाठी या वस्तूंना मोठी मागणी होत आहे.

सजावटीच्या कामांना वेग
क्रेप बॉल, ख्रिस्टल बॉल, ख्रिस्टल रिबन आदींची सध्या चलती आहे. सॅटीन फ्लॉवरच्या माळांनी बाजार सजला असून ही फुले आकर्षक दिसत आहेत. वेलवेटनी सजलेली इको फ्रेंडली मखर, वेलवेटचे रुमाल, बाप्पा मोरयाची पट्टी, टोपी, भगवे झेंडे अशा अनेक वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत. घरोघरी गणेश आगमनाची तयारी तर सुरूच आहे, पण यावर्षी आरास कशी आकर्षक करता येईल, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यानुसार विविध वस्तुंची खरेदी सुरू झाली आहे. मंडप उभारणी तसेच सजावटीसाठीची तयारी सुरू झाली आहे.

खरेदीसाठी गर्दी
नोटबंदी आणि जीएसटीमुळे खिशाला झळ बसल्याने नागरिक बेजार झाले असले तरी गणरायाच्या चाहुलीने ओतूरमधील बाजारपेठांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली दिसून येत आहे. गणेश मुतींच्या खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी अष्टगंध, उदबत्तीपासून हजारो रुपयांच्या सजावटीचे साहित्य आणि आभूषणांनी बाजारपेठा सजल्या आहेत. सीडी, कॅसेटवरील गौरी-गणपती गीते, प्लॅस्टिक हार, थर्माकोलची मखरे, रोषणाईचे विविध साहित्य, थर्माकोलची मखरे यांच्यासह प्लॅस्टिक आणि कागदाची फुले बाजारात उपलब्ध आहेत.

मुर्तीच्या उंचीवर ठरतेय हाराची किंमत
फुलांच्या कमानी, तोरणांची सजावट, आकर्षक पडदे यांनाही मागणी आहे. खास दक्षिणेकडून मागवण्यात आलेले जांभळ्या-लाल रंगाचे कृत्रिम हार भक्तांसाठी खास आकर्षण ठरत आहेत. रुद्राक्षाचे सोनेरी मण्यांचे हार, लाल गोंडा आणि मोत्यांचे हार आदी प्रकारचे हार विक्रीसाठी बाजारात आहेत. हारांची किंमत ही गणरायाच्या उंचीवर अवलंबून असून, यंदा बाजारात खास घरगुती गणपती बाप्पांसाठी फेटेही उपलब्ध आहेत. मोरपिशी, पिवळा, जांभळा, केशरी आणि त्यावर सुंदर सोनेरी काठ अशा पद्धतीचे फेटे असून या फेट्यांची किंमत 70 रुपयांपासून आहे. अशा पारंपरिक फेट्यांना नवीन झळाळी देण्यासाठी मोत्यांपासून बनवलेले रंगीत लटकनसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. या लटकनची किंमत 30 रुपयांपासून पुढे आहे.