चेन्नई : तामिळनाडूच्या राजकारणाला सोमवारी पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. एकमेकांविरोधात दंड थोपाटत वेगवेगळे झालेल्या अन्ना द्रमुक (एआयडीएमके) पक्षाचे नेते मुख्यमंत्री ई. पलानीसामी व बंडखोर नेते माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी सहा महिन्यानंतर एकत्र येत आपले गट मूळ पक्षात विलीन केले. पन्नीरसेल्वम यांना राज्याचे उपमुख्यमंत्री बनविण्यात आले असून, सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विलिनीकरणानंतर पन्नीरसेल्वम यांनी अम्मा व एआयडीएमकेसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगून पलानीसामी यांच्या समर्थनाशिवाय हे शक्य झाले नसते असे सांगितले. पक्षाच्या मजबुतीसाठी आणि पुन्हा एकवेळ सत्ताप्राप्तीसाठी आपण प्रयत्न करू, स्व. जयललिता यांचे स्वप्न साकार करू, अशी घोषणाही त्यांनी याप्रसंगी केली. दरम्यान, या विलिनीकरणापासून पक्षाच्या महासचिव व्ही. के. शशिकला यांना मात्र दूर ठेवण्यात आले होते. सद्या कारागृहात असलेल्या शशिकलांना लवकरच पक्षातून हाकलून लावले जाईल, अशी शक्यताही सूत्राने वर्तविली.
पक्षाचे मूळ निवडणूक चिन्ह परत मिळणार!
डिसेंबरमध्ये एआयडीएमकेच्या प्रमुख व माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या आकस्मिक निधनानंतर ओ. पन्नीरसेल्वम यांना मुख्यमंत्री बनविण्यात आले होते. फेब्रुवारीमध्ये त्यांचा तडकाफडकी राजीनामा घेण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी पक्षप्रमुख व्ही. के. शशिकला यांच्याविरोधात बंड पुकारले होते. हे बंड मोडित काढून शशिकला यांनी ई. पलानीसामी यांना मुख्यमंत्री बनविले होते. पलानीसामी हे शशिकला यांचे निकटवर्तीय व विश्वासू म्हणून गणले जात होते. परंतु, सहा महिन्यांच्या कालावधीत कार्यकर्ते, पक्ष पदाधिकारी यांच्याकडून आलेल्या दबावापुढे पलानीसामी झुकले व त्यांनी ओ. पन्नीरसेल्वम यांच्याशी विलिनीकरणाबाबत चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी स्वतंत्र गट निर्माण केल्याने पक्षाचे निवडणूक चिन्हही गोठविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. परंतु, आता दोन्ही गट एकत्र आल्याने पक्षाचे निवडणूक चिन्ह एआयडीएमके पक्षाकडे कायम राहणार आहे. सोमवारी दोन्ही गट मूळ पक्षात विलीन करत असल्याची घोषणा दोन्ही नेत्यांनी केली. त्यानंतर काही तासातच ओ. पन्नीरसेल्वम यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना पक्षाचे संयोजक तर पलानीसामी यांना पक्षाचे सहसंयोजक बनविण्यात आले आहे. पन्नीरसेल्वम यांच्याकडे अर्थमंत्रालयदेखील सोपविण्यात आले आहे. विलिनीकरणानंतर दोन्ही नेते मरिना समुद्रकिनारी असलेल्या स्व. जयललिता यांच्या स्मृतीस्थळी गेले व त्यांना संयुक्तपणे आदरांजली अर्पण केली.
पक्षाची सूत्रे समन्वयन समितीकडे!
या राजकीय विलिनीकरणामागे भाजपचे अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात असल्याची चर्चा तामिळनाडूत रंगली होती. ओ. पन्नीरसेल्वम गटाकडे 10 आमदार व काही खासदार होते. तसेच, त्यांना जनतेतूनही उदंड पाठिंबा होता. तर पलानीसामी गटाकडे 100 पेक्षा अधिक आमदार होते. पन्नीरसेल्वम यांना मोदी यांनी आपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे गत सहा महिन्यांच्या अनेक संकटानंतरही ते तामिळनाडूच्या राजकारणात पाय रोवून उभे होते. आता अन्ना द्रमुक पक्षाचे प्रमुख संयोजकही पन्नीरसेल्वम असणार आहेत. पक्षाचे सूत्रे 11 सदस्यीय समन्वयन समितीकडे राहणार असून, स्व. जे. जयललिता यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करू, असे सोमवारी या दोन्ही नेत्यांनी घोषित केले. दरम्यान, व्ही. के. शशिकला यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी पन्नीरसेल्वम यांनी केली होती. त्यावर आता समन्वय समिती निर्णय घेणार आहेत. एआयडीएमके लवकरच केंद्रातील सत्ताधारी एनडीएमध्ये सहभागी होण्याची शक्यता असून, एक-दोन दिवसांत अमित शहा चेन्नईला जाणार आहेत.