इंदापूर । राजकीय सूड भावना व चुकीची कार्यवाही करून सरकारने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांना मागील 22 महिन्यांपासून तुरुंगात कैद करून ठेवले आहेत. त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राज्यातील ओबीसी समाज एकवटला असून सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इंदापूर तालुक्यातील सर्व ओबीसींच्या वतीने मंगळवारी (दि.23) इंदापूरात ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
इंदापूरनंतर संपूर्ण राज्यभर असे महामोर्चे ठीकठिकाणी काढण्यात येणार असल्याने सरकारने याची वेळीच दखल घ्यावी व भुजबळ यांना तात्काळ जामीन मिळण्यासाठी सकारात्मक भुमीका घ्यावी अशा इतर मागण्यांसाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे इंदापूर तहसील कार्यालयाजवळ सभेत रुपांतर होणार आहे. त्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसिलदारांना देण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सक्त वसुली संचालनालय कायद्यातील महत्त्वाचे कलम रद्द करण्यात आले असून छगन भुजबळांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु सरकारने पुन्हा त्यांच्यावर नवीन खोटे आरोप लावले आहेत. जेणे करून राज्यातील संपूर्ण ओबीसी, बारा बलुतेदार व माळी समाजाचा आवाज दाबला जाईल, असा आरोप ओबीसी समाजाकडून होत आहे.
ओबीसींच्या विविध मागण्या
भुजबळांची जामीनावर सुटका व्हावी ही राज्यातील ओबीसी, माळी व बारा बलुतेदार समाजाची प्रमुख मागणी असून या मागणीचे रणशींग इंदापुरात फुंकून याचा वणवा संपुर्ण राज्यभर पेटण्या आधीच सरकारने याची खबरदारी घ्यावी अन्यथा येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सरकारला आपली जागा निश्चितच दाखवून देऊ. याचबरोबर मागील 90 वर्षापासून प्रलंबीत राहीलेली ओबीसी जाती निहाय जनगनणा त्वरीत सुरू करण्यात यावी, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाच्या बजेटमधे भरीव वाढ करण्यात यावी, शालेय विद्यार्थी शिष्यवृृत्ती तात्काळ सुरू करण्यात यावी, इत्यादी प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात येणार आहे. या महामोर्चाला जिल्ह्यातील ओबीसी, बारा बलुतेदार व माळी समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता इंदापूरातील श्रीराम चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. श्रीराम वेस मार्गे संभाजी चौक तहसिल कार्यालयाजवळ त्याचे सभेत रुपांतर होणार असल्याची माहीती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आलेली आहे.