ओबीसी आरक्षणासाठी ‘चक्काजाम आंदोलन’
भुसावळ विभागात भाजपा पदाधिकार्यांनी आघाडी सरकारचा केला निषेध : सरकारच्या नाकर्तेपणामुळेच आरक्षण गेल्याचा दावा
भुसावळ : महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजावर अन्याय झाल्याची भावना भाजपा पदाधिकार्यांनी व्यक्त करीत भुसावळ विभागात ठिकठिकाणी शनिवारी सकाळी रस्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे काही वेळेसाठी वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत नंतर त्यांची सुटका केली. प्रसंगी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी पदाधिकार्यांनी केली.
भुसावळात महामार्ग ठप्प
भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ग्रामीण रुग्णालयाजवळील भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे यांच्या पेट्रोल पंपासमोर शनिवारी सकाळी 11.30 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आमदार संजय सावकारे यांच्यासह आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत रस्त्याच्या बाजूला केले. सुमारे अर्धा तास आंदोलनकर्त्यांनी प्रसंगी आघाडी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप भागवत, शहरचे बाबासाहेब ठोंबे आदींसह पोलिसांनी बंदोबस्त ठेवला. महामार्ग रोखण्यात आल्याने 20 मिनिटे वाहतूक ठप्प झाली.
सर्वच आरक्षणात खोडा : आमदार संजय सावकारे
मराठा समाज आरक्षण असो की ओबीसी आरक्षण असो महाविकास आघाडी सरकारने खोडा घातला असल्याचा आरोप यावेळी आमदार संजय सावकारे यांनी केला. ते म्हणाले की, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षणही या आघाडी सरकारने थांबवले असून सर्वच समाजावर अन्याय या सरकारने केला आहे. सर्व समाजाला न्याय मिळावा या मागणीसाठी आजचे आंदोलन असल्याचे ते म्हणाले.
यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलनात आमदार संजय सावकारे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, पंचायत समितीचे माजी सभापती सुनील महाजन, नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील, महिला जिल्हाध्यक्षा शैलजा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अजय भोळे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अनिरुध्द कुलकर्णी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, राजू खरारे, नगरसेवक राजेंद्र नाटकर, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, अमित आसोदेकर, अमोल महाजन, साकेगावचे प्रभारी सरपंच आनंदा ठाकरे, फेकरीचे प्रशांत निकम, अजय नागराणी, सतीश सपकाळे, प्रकाश बतरा आदी सहभागी झाले.