ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे : कुंजीर

0

मराठा संवाद यात्रेमध्ये व्यक्त केले मत

वडगाव मावळ : मराठा समाजाचे गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. मराठा समाजासाठी आरक्षण मिळणे मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या समाजातील मुलांचे भावितव्य बदलण्यास मदतच होणार आहे. मात्र हे आरक्ष मराठा व कुणबी एकच असल्याने ते ओबीसी प्रवर्गातच मिळायला हवे. आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर जाहीर न केल्यास 2019 मध्ये या सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक शांताराम कुंजीर यांनी दिला. मोर्च्याच्यावतीनेवतीने आरक्षणासह विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मराठा संवाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप सोमवारी येथील पंचायत समिती चौकात झाला. त्या वेळी कुंजीर बोलत होते. यावेळी राज्य समन्वयक रघुनाथ चित्रे, जिल्हा समन्वयक रमेश हांडे, शंकर राक्षे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, प्राची दुधाणे, वामन बाजारे, अंकुश राक्षे, शंकर राक्षे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

42 तरूणांनी दिले बलिदान

आपले मत व्यक्त करताना रमेश हांडे यांनी सांगितले की, आरक्षणाच्या मागणीसाठी आत्तापर्यंत 42 तरुणांनी बलिदान दिले आहे. सुमारे पंधरा हजार जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काही जणांकडून आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे, तर काही जण आरक्षणाची टिंगलटवाळी करत आहेत. यापुढे अशी टिंगलटवाळी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही आमचा हक्क मागतोय तो घेतल्याशिवाय राहणार नाही. यावेळी प्राची दुधाणे, रघुनाथ चित्रे, अंकुश राक्षे यांचीही भाषणे झाली. नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी प्रास्ताविक केले. अमोल ढोरे यांनी आभार मानले.