डीआरएम कार्यालयावर धडक ; न्याय देण्याची अर्धांगिणींनी केली मागणी
भुसावळ- गुडस् शंटींग विभागातील ओबीसी असलेल्या लोकोपायलटांची पदोन्नती रखडल्याने सुमारे 35 लोकोपायलटांच्या अर्धांगिणींनी डीआरएम कार्यालयात धडक देत न्यायाची मागणी केली. याप्रसंगी महिलांनी डीआरएम विवेककुमार गुप्ता यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित कार्मिक विभागाकडे तक्रार करण्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल्याने या महिलांनी नाराजी व्यक्त केली.
2018 पासून पदोन्नतीची लिस्ट नाही
31 मे रोजी नांदगाव विभागातील शंटींग व गुडस् विभागाती लोकोपायलटस्च्या अर्धांगिणींनी डीआरएम प्रशासनाला निवेदन दिले होते. तत्कालीन डीआरएम आर.के.यादव यांच्या कार्यकाळात त्यांची भेट घेवून हा प्रश्न सोडवण्याची मागणी केल्यानंतर यादव यांनी सिनीयर डीपीओ व डीईई टीआरओ यांना तत्काळ दखल घेण्याचे आदेश दिल्यानंतर 29 डिसेंबर 2017 रोजी प्रमोशन ऑर्डर निघाल्या होत्या मात्र अद्यापही प्रमोशन लिस्ट न निघाल्याचे निवेदनात नमूद आहे. विविध संघटनांच्या दबावामुळे प्रशासन एलपीजी ऑर्डर काढण्यास विलंब करीत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, डीआरएम कार्यालयात नीलिमा संदीप भारंबे, ममता विजय महाजन, प्राजक्ता पंकज चौधरी, लतिका मिलिंद महाजन, रूपाली किरण महाजन, गौरवी गिरीश हुद्दार, संगीता दशरथ पाचपांडे यांच्यासह सुमारे 25 महिला उपस्थित होत्या.