ओम पार्कमधील दोन बंद घरे फोडली

0

भुसावळ । शहरातील यावल रोडवरील ओम पार्कमध्ये चोरट्यांनी दोन बंद घरांना टार्गेट केले मात्र सुदैवाने घरात काहीही मूल्यवान वस्तू नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाती परतावे लागले. शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास नागरिकांना जाग आल्याने त्यांनी दोन चोरट्यांना पळताना पाहिले. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी बंद घरांना टार्गेट केले आहे. या भागात पोलिसांची गस्त अनियमित होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.

रहिवाशांना जाग आल्याने फसला डाव
भुसावळ शहरातील यावल रस्त्यावरील ओम पार्क परीसरातील रहिवासी तथा माध्यमिक शिक्षक पतपेढीतील कर्मचारी ईश्‍वर फालक यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा अज्ञात चोरट्यांनी शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तोडल्याने त्यांना जाग आली. ते बाहेर आल्यानंतर दोन चोरट्यांना त्यांनी पळताना पाहिली तर फालक यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या बळीराम केशव कोल्हे यांचे बंद घरही चोरट्यांनी फोडले. कोल्हे पुण्यात राहत असल्याने घरात रोकड वा मौल्यवान दागिने नसल्याची माहिती रहिवाशांनी दिली. दोन्ही ठिकाणी कुठलाही ऐवज चोरीला गेला नसलातरी चोरटे मात्र सक्रिय झाल्याने रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. शहर पोलिसांनी या भागात गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.