जि.प.अध्यक्षांचा गौप्यस्फोट : पक्षाच्या सदस्यांचे आरोप फेटाळले
जळगाव : जिल्हा परिषदेच्या आतापर्यंतच्या परंपरेला अधीन राहून किंबहुना त्याहीपेक्षा अधिक चांगल्या प्रमाणात सर्व सदस्यांना निधी देवून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कुणावर ही निधी देतांना अन्याय केला नाही. ओरड करणार्या सदस्यांना अतिरीक्त निधी देण्यात आल्याचा गौप्यस्फोट जि.पच्या अध्यक्षा उज्वला पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
डीपीडीसच्या निधी वाटपात जिल्हा परिषद अध्यक्षांनी अन्याय केल्याची ओरड क रीत भाजपाच्याच जिल्हा परिषद सदस्य लालचंद पाटील व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी स्थायी सभेत गोंधळ घातला होता. यावेळी त्यांनी जि.प. अध्यक्षा ना. उज्वला पाटील यांच्यावर आरोप देखिल केले. या आरोपांना उत्तर देण्यासाठी ना. उज्वला पाटील यांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. ना. उज्वला पाटील म्हणाल्या की, स्वपक्षाच्या विरोधकांना किमान 30 लाख दिले असुन सत्ताधार्यांना पारंपारीक पध्दतीनेच निधी वितरीत केला असल्याचे त्यांनी सां गितले. काही अधिकार्यांकडून पदाधिकारी व सदस्यांना वेळोवेळी चुकीची माहिती देऊन संभ्रम निर्माण केला जात आहे. सदस्यांवर खरोखर अन्याय झाला असेल तर त्यासंदर्भात न्याय मागण्याचा अधिकार हा लोकशाहीने सदस्यांना दिला आहे. परंतु निधी देतांना कुठलाच अन्याय केला नसल्याचे सांगत अध्यक्षांनी सर्व आरोप फेटाळून लावले.
अधिकचा निधी देण्याची परंपरा जूनीच
ग्रामीण भागातील नागरीक अत्यावश्यक समस्येच्या मुद्दा घेऊन पदाधिकार्यांकडे येत असतात. त्यासाठी अत्यावश्यक बाब म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती यांना अधिकचा निधी देण्याची परंपरा आधीपासूनची आहे. ती आत्ताच जन्माला आली नाही असेही ना.उज्वला पाटील म्हणाल्या.अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचा स्वतंत्र निधी प्राप्त झालेवर सर्व सदस्यांना विचारात घेवून जिल्हा परिषदेत असलेल्या राखीव निधीचे नियोजन करून तेव्हाही न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेत पुन्हा महिला राज
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली असुन जळगावच्या जिल्हा परिषदेत पुन्हा महिला राज येणार आहे. सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. आगामी डीसेंबर महिन्यात जि.प अध्यक्ष निवड होणार आहे.यापुर्वीच जळगाव लोकसभा मतदार संघातुन उज्वला पाटील यांना संधी मिळाल्याने यावेळी भाजपाकडून रावेर लोकसभा मतदार संघातुन संधी दिली जाण्याची शक्यता आहे. विद्यमान बांधकाम सभापती रजनी चव्हाण व विद्या खोडपे या माजीमंत्री गिरीष महाजन यांच्या मतदार संघातील असल्याने त्यांना संधी दिल जावू शकते.तसेच पल्लवी सावकारे यांचा देखील अध्यक्षपदासाठी विचार होवू शकतो. गेल्यावेळी नंदा अमोल पाटील यांची संधी हुकल्याने यावेळी त्यांना संधी दिली जाऊ शकते. माधुरी अत्तरदे देखील जि.प अध्यक्षपदासाठी दावा करू शकतात. महाशिवआघाडीच्याही हालचाली जि.पत शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस व भाजपाचा नाराज गट एकत्र येण्याची देखील शक्यता आहे.या महा शिव आघाडीकडून राष्ट्रवादीच्या डॉ.निलम पाटील,अमळनेरच्या जयश्री पाटील यांची देखील नावे चर्चेत आहे. राज्यात महाशिवआघाडीचे सरकार स्थापन झाले तर जि.पत देखील सत्ता बदलासाठी हा फॉर्म्युला ठरणार असल्याची चर्चा आहे.