गुजराल पेट्रोलपंपाजवळ दुचाकीवरुन उडी घेत केली विद्यार्थ्यांना सुटका
जळगाव- विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापकाचा चिरंजीव योजीत रामेश्वर चव्हाण या शाळकरी विद्यार्थ्याला मारहाण करून दोघांनी त्याच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी ओरीयन स्कूलच्या प्रवेशाव्दाराजवळ घडली. दरम्यान, प्रसंगावधान राखत विद्यार्थ्याने गुजराल पेट्रोलपंप परिसरात पोहचल्यावर दुचाकीवरून उडी घेत स्वत:ची सुटका करून घेतली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला़
तोंड दाबून दुचाकीवरुन पळविण्याचा प्रयत्न
शहरातील ओरियन सीबीएसई स्कूलच्या इयत्ता सहावीच्या वर्गात योजीत रामेश्वर चव्हाण हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे़ कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ़ आर. आर. चव्हाण यांचा चिरंजीव आहे़ बुधवारी सकाळी योजीत हा स्कूल व्हॅनने शाळेत आला़ मात्र, शाळेचा गणवेश घातलेला नसल्यामुळे दुपारी 12़ 25 वाजेच्या सुमारास शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आला व गणवेश आणण्यासाठी वडीलांना फोन करण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला मोबाईल मागितला़ परंतू, त्या व्यक्तीने त्या बाजूला घेऊन जाऊन मारहाण केली व दुचाकीवर असलेल्या दुसर्या साथीदाराला बोलवून योजीत याचे हाताने तोंड दाबून अपहरण करण्याचा प्रयत्न केला़
संधी साधून दुचाकीवरून घेतली उडी
अपहरणकर्ते दुचाकीवरून योजीत याला घेऊन जात असताना गुजराल पेट्रोल पंपाजवळ दुचाकी हळू झाली़ ही संधी पाहत योजीतने दुचाकीवरून उडी घेतली़ यात त्याच्या पायाला दुखापत झाली़ नंतर त्याने जवळच असलेल्या मेडीकल स्टोअर्सवरून वडील प्रा़ डॉ़ आर. आर.चव्हाण यांना फोन केला़ व त्यांना बोलवून संपूर्ण हकीकत सांगितली़ हा प्रकार त्यांनी त्वरित शाळा व पोलिसांना कळविला़ तसेच पोलिसात तक्रार दाखल केली़