ओलाविरोधात सर्वपक्षियांची एकजूट

0

स्थानिक टुरिस्ट व्यावसायिकांना पाठींबा

लोणावळा : स्थानिक टुरिस्ट व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम करू पाहणार्‍या ओला कंपनीला लोणावळ्यात प्रवेश करू देण्याविरोधात उभ्या राहिलेल्या लोणावळा खंडाळा टुरिस्ट टॅक्सी चालक मालक संघटनेच्या मागे एकजुटीने उभे राहण्याचा निर्णय एका बैठकीत लोणावळा शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतला. तशी वेळ आलीच तर ओला कंपनीला शहरातून हद्दपार करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

यापूर्वी ओला कंपनीने शहरात व्यवसायाच्या माध्यमातून प्रवेशाचा प्रयत्न येथील स्थानिक टुरिस्ट व्यावसायिकांनी हाणून पाडला होता. पण ओला कंपनीने पुन्हा शहरातील टुरिस्ट व्यवसायात शिरकावाचा प्रयत्न सुरू केला आहे. यामुळे येथील स्थानिकांच्या व्यावसायावर मोठा परिणाम होणार आहे. याबाबत खंडाळ्यातील आंबेकर स्मृती भवनात सर्व पक्षीय नेते आणि स्थानिक टुरिस्ट व्यावसायिकांची बैठक पार पडली. यावेळी ओला कंपनीला शहरातून हद्दपारीबाबत आवश्यक ती सर्व पावले उचलण्याबाबत एकमुखी निर्णय घेतला. तर एक जबाबदारी आणि नैतिकता म्हणून स्थानिक तरुणांमागे उभे राहणे हे आमचे कर्तव्य असून, त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून हल्लाबोल आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुनील शेळके यांनी दिला. तर नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी तुमच्या मागे ठाम उभे राहणार असल्याचे आश्‍वासन संघटना कार्यकर्त्यांना दिले.

यांची होती उपस्थिती
यावेळी लोणावळा उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक निखील कवीश्वर, सुधीर शिर्के, रचना सिनकर, सुवर्णा अकोलकर, मच्छिंद्र खराडे, धर्मेंद्र शेट्टी, नारायण आंबेकर, राजू बोराटी, बाळासाहेब कडू, महेश केदारी, मंजुश्री वाघ, रुपेश नांदवटे, भालचंद्र खराडे, गणेश मावकर, मुकेश परमार, दत्तात्रय गवळी आदीं उपस्थित होते.