मुंबई:प्रकाश आंबेडकर असदुद्दीनओवेसी हे एकत्र आले आहेत. २०१९ च्या निवडणुका ते एकत्र लढतील व ताकद दाखवतील अशी घोषणा उभयतांकडून झाली आहे. हे दोघेही कालपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सोयीचे राजकारण पडद्यामागून करीत होते. आता ते दोघे उघड उघड हातात हात घालून २०१९ सालात भाजपास मदत करतील. त्यासाठीच आंबेडकर आणि ओवेसी यांची अभद्र युती झाली आहे’, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारिप-बहुजन महासंघ आणि वर टीका केली आहे.
भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवण्याची घोषणा केली आहे. येत्या २ ऑक्टोबर रोजी औरंगाबाद येथे या युतीची सभाही होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून या युतीवर हल्ला चढवला आहे. ‘दलितांनी दलित म्हणूनच डबक्यात राहावे व मुसलमानांनी देशाचे नागरिक म्हणून नाही, तर फक्त मुसलमान म्हणूनच जगावे यासाठी डबकी तयार केली जातात. प्रकाश आंबेडकर व ओवेसी यांनी एकत्र येऊन नवे डबके तयार केले आहे. दलित व मुसलमानांनी एकत्र येऊन ही डबकी उधळून लावली पाहिजेत. २०१९च्या निवडणुकीत कुणाला ‘चारायचे’ व कुणाला ‘पाडायचे’ यासाठी ठरवून टाकलेला हा डाव आहे’, असा आरोप उद्धव यांनी केला आहे.