ओव्हरटेकच्या नादात अपघात; 7 जखमी

0

जळगाव । जळगावकडून भुसावळकडे जाणार्‍या मालवाहतूक करणारा मॅक्सिको ट्रकने जळगाव दुरदर्शन टॉवरजवळ दुपारी 3.30-4 वाजेच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणार्‍या दोन मोटारसायकल व प्रवाशी रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा चालकासह सातजण गंभीर जखमी झाले. जखमी झालेल्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर सात जणांपैकी तिघांना प्राथमोपचारानंतर खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत मालवाहतूक ट्रकसह चालकाला नशिराबाद पोलिसांनी ताब्यात घेतले असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे. दरम्यान अपघातानंतर जखमी रूग्णांना जिल्हा रूग्णालयात 108 ने तात्काळ आणले मात्र जखमींना आत नेण्यासाठी ट्रेचर नसल्याने जखमींच्या नातेवाईकांना जिल्हा रूग्णालयात एकच गोंधळ घातला होता.

असा झाला अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 3.30-4 वाजेच्या सुमारास जळगाव दुरदर्शन टॉवरजवळ जळगावकडून भुसावळकडे जाणारा मालवाहू मॅक्सिको ट्रक क्र. (एम.एच.19 बीएम 6868)ने ओव्हरटेक करतांना भुसावळकडून मोटारसायकल बजाज डिस्कव्हर क्र.(एम.एच 19 बीएल 8354) ला जोरदार धडक दिली त्यामुळे मोटारसायलक चालक हिरामण साहेबराव चौधरी (वय-44) व पत्नी संगीता हिरामण चौधरी (वय-38) रा. गहूखेडा ता.रावेर हे दोन्ही रोडच्या बाजूल फेकले गेले. मोटारसायकलला धकड दिल्यानंतर डिस्कव्हर दुचाकी ही मागून येणार्‍या रिक्षा क्र.(एम.एच.19 जे.6499) ला आदळली त्यामुळे रिक्षाच्या मागूनदेखील येणारी मोपेड अ‍ॅक्टिव्हा मोटारसायकल क्र.(एम.एच.19 ए.सी. 5735) या अपघातातचा फटका बसला. त्यामुळे रिक्षाचालक प्रभाकर मुरलीधर थोरात (रा.तरसोद) यांच्यासह प्रवासी भारती सुरेश राजपूत (वय-40) व सुमित्रा राजेंद्र मिस्तरी (वय-45) रा. वाघ नगर हे तिघे जखमी झाले. तर मागून येणार्‍या अ‍ॅक्टिवा वरील महम्मद उमेद महम्मद बागवान (वय-18) आणि महम्मद अझहर महम्मद हमीद (वय-18) दोन्ही रा. सातारा, भुसावळ हे दोन्ही असे एकुण सात जण गंभीर जखमी झाले. जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

सिव्हिलच्या कर्मचार्‍यांची चालढकल
या अपघातात रिक्षातील प्रवासी भारती राजपूर यांच्या उजव्या पायाचे हाड मोडल्याने त्यांच्या पायाचा एक्स-रे काढण्यासाठी गेले असता. एक्स-रे मशिन बंद असल्याचे जिल्हा रूग्णालयातील कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले. ‘ते दुरूस्त होण्यासाठी वेळ लागेल त्यामुळे तुम्हाला थांबावे लागेल तुम्ही खासगी रूग्णालयात जावे असा अनाहुत सल्ला दिल्याने नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. जिल्हा रूग्णालयात होणार्‍या उदासिन कारभाराबाबत नातेवाईकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती.

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडून होतोय उपचार
जिल्हा रूग्णालयात अनुभवी वैद्यकिय अधिकारी वेळेवर हजर नसल्याने जखमींवर वैद्यकिय महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर विद्यार्थीच मलमपट्टी करतांना दिसून येते. तर गंभीर स्वरूपाचा अपघात झाला तरी वैद्यकिय अधिकारी त्वरीत धाव घेत नसल्याचे ओरड येथील रूग्णांकडून बोलले जात आहे. जखमी झालेल्या रूग्णांवर अनुभवी वैद्यकिय अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थ्यांनी उपचार केले पाहिजे मात्र असे होतांना कधीच दिसून येत नाही. तर केस पेपर काढल्यानंतर नविन रूग्णाना रूग्णांची कुठलीच माहिती नसल्याने त्याची मोठी गैरसोय होते.

तरसोदच्या गणपतीचे घेतले दर्शन
आज अंगारकी चतुर्थी असल्याने गणपती दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असते त्यामुळे जळगाव शहरातून अनेक भाविकांची याच रस्त्यावर वर्दळ असते.दुरदर्शन टॉवरजवळ झालेल्या अपघातात रिक्षातील जखमी महिला भारती राजपूत व सुमित्रा मिस्तरी ह्या तरसोदच्या प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. गणपतीचे दर्शन झाल्यानंतर दोन्ही प्रवासी महिला रिक्षा क्र.(एम.एच.19 जे.6499) ने जळगावकडे येत असतांना हा अपघात झाला. या अपघातात भारती राजपूत यांच्या उजव्या पायाचे हाड मोडल्याने त्यांना तातडीने डॉ. प्रताप जाधव यांच्या मातली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यात रिक्षा चालकदेखील जखमी झाला असून त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्ट्रेचरअभावी रूग्णांची गैरसोय
अपघात झाल्यानंतर 108 नंबरच्या रूग्णवाहिकेत सर्व सात जखमींना एकच वेळी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णांना तात्काळ ट्राम सेन्टरमध्ये उपचारार्थ दाखल करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात केवळ एकच स्ट्रेचर असल्याने रूग्णांची मोठी गैरसोय झाली. जखमी रूग्णांवर तत्काळ उपचार मिळावा यासाठी नातेवाईकांना स्वतः उचलून ट्रामा सेंटरमध्ये पोहचविले.

रुग्णभेटीसाठी जाणारेच रुग्णालयात
मोटारसायकलवर जाणारे हिरामण चौधरी व संगिताबाई चौधरी हे दोघे दाम्पत्य हे गहूखेडा ता. रावेर येथून नातेवाईक साडू धनराज विश्‍वनाथ पाटील हे आजारी असल्याने त्यांना शहरातील ऑर्किड हॉस्पिटलला अडमिट केले होते. त्यांना पाहण्यासाठी जळगाव शहराकडे जात असतांना अपघात झाला. या अपघातात हिरामण चौधरी यांच्या डोके व हनुवटीस गंभीर दुखापत झाली तर संगिताबाई चौधरी यांच्या हात जखमी झाला. या अपघातानंतर संबंधित जखमी रूग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात एकच धाव घेतली होती. रुग्णभेटीसाठी जायला निघालेल्या चौधरी दाम्पत्यास स्वत:च रुग्णालयात दाखल व्हावे लागले.