ओव्हरटेकच्या प्रयत्नात ट्रकची बसला धडक ; चालकासह 18 प्रवासी जखमी

0

सार्वे फाट्याजवळ अपघात ; जखमींवर पारोळ्यासह धुळ्यात उपचार

पारोळा- ओव्हरटेकच्या प्रयत्नात भरधाव ट्रकने बसला समोरून दिलेल्या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह बसमधील 18 प्रवासी जखमी झाले. शनिवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास जळगाव-पारोळा मार्गावरील सार्वे फाट्याजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले तर अन्य जखमींना धुळे सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. पारोळा पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

ओव्हरटेकच्या प्रयत्न ; ट्रक धडकली बसवर
धुळे आगाराची जळगाव-धुळे बस (क्रमांक एम.एच.20-1957) धुळ्याकडे निघाली असताना सार्वे फाट्याजवळ समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक (जी.जे.01 बी.व्ही.0912) ने बसला समोरून धडक दिल्याने दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला तर बसचालक फारूक शेख व ट्रकच्या चालकांनाही जबर मार लागला तसेच बसमधून प्रवास करणारे तब्बल 17 प्रवासी जखमी झाले. जखमींवर सुरूवातील पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना धुळे सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. आमदार सतीश पाटील हे या मार्गावरून जात असताना त्यांना अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी जखमींना मदत केली. सायंकाळी बस चालक अशोक साहेबराव अटकाळे (51, रा.देवपूर, धुळे) यांनी पारोळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकच्या चालकाविरुद्ध (नाव, गाव माहित नाही) गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जयवंत पाटील करीत आहेत.