नवी मुंबई । शुक्रवारी सकाळी घणसोली येथे राहणार्या भाग्यश्री शिंदे हिचा अपघाती मृत्यू खडीवरून घसरून न होता ओव्हरटेक केल्याने झाला असल्याचा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी लावला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी भाग्यश्रीच्या अपघातीमृत्यूनंतर तब्बल दीड तासांहून अधिक काळ मुंबई-गोवा महामार्ग अडवून धरणार्या ग्रामस्थांविरोधात सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या या कारवाईबाबत ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भाग्यश्री शिंदे ही पूर्वी ठाण्यात राहण्यास होती. ती ठाण्यातील एअरटेल गॅलेरीमध्ये कॅशिअर म्हणून काम करत होती. दोन महिन्यांपूर्वीच ती कुटुंबासह घणसोली येथे राहण्यास आली होती. गुरुवारी सायंकाळी ती पेण येथे राहणार्या मैत्रिणीकडे गेली असता तिला उशीर झाला.
ग्रामस्थांचा होता विरोध
मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी टाकण्यात आलेल्या खडी-मातीमुळे भाग्यश्रीचा मृत्यू झाल्याने जागेवरच पंचनामा करण्यात यावा, यासाठी ग्रामस्थांनी मुंबई-गोवा महामार्ग अडवून धरत भाग्यश्रीचा मृतदेह उचलण्यास मज्जाव केला. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली. त्यानंतर पोलिसांनी या अपघाताला जबाबदार असलेल्या ट्रेलरचालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पोलिसांनी या अपघातानंतर भाग्यश्रीचा मृत्यू हा रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी टाकण्यात आलेल्या खडीमातीमुळे घसरून झाला नसून ट्रेलरला ओव्हरटेक करताना झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. त्यामुळे या अपघाताला मुंबई-गोवा महामार्ग दुरुस्त करणारा कंत्राटदार जबाबदार नसल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. त्याशिवाय पोलिसांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांवर सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले.