रिक्षात चालकाजवळ बसणे तरुणीला जीवावर बेतले ; कंटेनरच्या धडकेनंतर खोल साईडपट्ट्यामुळे रिक्षा उलटली ; रिक्षाचालकासह विद्यापीठाचे इतर दोघे कंत्राटी कर्मचारी गंभीर
जळगाव – ओव्हरलोड प्रवासी रिक्षात रिक्षाचालकाजवळ समोर बसणे विद्यापीठाच्या वित्त विभागाची कंत्राटी कर्मचारी तरुणीला जीवावर बेतले आहे. कंटेनरने रिक्षाला धडक दिल्यानंतर रिक्षातून बाहेर महामार्गावर पडून डोक्यावरुन चाक गेल्याने श्रेया सुनील काजळे (वय 26 रा. संभाजीनगर) या कर्मचारी तरुणीचा मृत्यू झाला आहे. बांभोरी जकात नाक्याजवळ शुक्रवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाता रिक्षाचालकासह विद्यापीठाचे परमेश्वर पांडुरंग थाटे वय 30 रा. केकतनिंभोरा.ता.जामनेर, मिनाक्षी विकास बाविस्कर वय 25 रा. शनिपेठ हे दोघे कंत्राटी कर्मचारी गंभीर जखमी त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
संभाजीनगर येथील सुनील वसंत काजळे हे रेमंड कंपनीत खरेदी विभागात नोकरीला आहे. मुलगी श्रेया हिचे एम कॉम पर्यंत विद्यापीठात शिक्षण पूर्ण झाले आहे. शिक्षण पूर्ण करताच दोन महिन्यांपूर्वी तीन नुकतीच विद्यापीठातच वित्त विभागात कंत्राटी तत्वावर कामाला लागली होती. नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता ती विद्यापीठात गेली होती. ड्युटी संपल्यावर रिक्षातून परतत असतांना अपघाताच्या रुपाने तिच्यावर काळाने झडप घातली.
रिक्षात समोर बसल्याने गेला जीव
रिक्षाचालक सोनू देवराम पाटील रा. शिवाजीनगर हुडको यांची प्रवासी रिक्षा (क्र.एम.एच.19. सी.डब्लू 1556) घेवून विद्यापीठाकडे गेले होते. तेथून त्यांनी रिक्षात प्रवासी बसविले. यात श्रेया काजळे ही समोर चालकाजवळ तर मिनाक्षी विकास बाविस्कर व विद्यापीठातीलच पत्रकारिता विभागात कंत्राटी कर्मचारी असलेले परमेश्वर थाटे हे रिक्षात मागच्या सिटावर बसले होते. त्यांच्यासोबत आणखी दोघे बसले होते. अशा प्रकारे रिक्षात चालकासह सात जण बसले होते. ही ओव्हरलोट रिक्षा विद्यापीठातून निघाली. बांभोरी जकात नाक्याजवळ समोर येत असलेल्या कंटेनरने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षाचालकाजवळ बसलेली श्रेया महामार्गावर पडली. धडक देणार्या कंटनेरचे मागचे चाक तिच्या डोक्यावरुन गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. धडक दिल्यावर खोल साईडपट्ट्यामुळे रिक्षा उलटल्याने मागे रिक्षाचालक सोन पाटील, मागे बसलेले परमेश्वर तसेच मिनाश्री खाली पडल्याने त्यांना डोक्याला तसेच पोटाला मार लागून गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळाहून पसार झाला होता.
रुग्णवाहिका कर्मचार्यांसह पोलिसांची तत्परता
अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे मनोज राजू पाटील, एपीआय गणेश चव्हाण, महेश महाले, प्रफुल्ल धांडे, समाधान ताकडे यांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी जखमींना रुग्णालयात हलविण्यासह वाहतूक सुरळीत केली. कासोदा येथून 108 रुग्णवाहिका घेवून डॉ. महेश कोळंबे, चालक काशिनाथ राठोड हे गरोदर महिलेला उपचारासाठी घेवून जिल्हा रुग्णालयात आले होते. तिला सोडल्यावर पुन्हा जात असताना त्यांच्यासमोर अपघात झाला. त्यांनी कुठलाही विलंब न करता गाडी जळगावकडे फिरविली व जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परमेश्वर याला हाताला फ्रॅक्चर झाले तसेच छातीला व पोटाला मार बसला आहे. तर मिनाश्री बाविस्कर तिच्या तोंडाला तसेच मांडीला दुखापत झाली आहे. दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून परमेश्वर यास अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.
वडीलांना मानसिक धक्का ; आईकडून लपविली माहिती
अपघाताची माहिती मिळताच श्रेया हिचे वडील सुनील काजळे सहकारी तसेच नातेवाईकांसह जिल्हा रुग्णालयात आले. त्यांना श्रेयाच्या मृत्यूचे कळताच मानसिक धक्का बसला होता. श्रेयाला सारंग लहान भाऊ असून तो मुंबईला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. उशीरापर्यंत श्रेयाच्या मृत्यूबाबत सारंग तसेच श्रेयाची आई स्मिता यांच्याकडून माहिती लपविण्यात आले आहे. रुग्णालयात श्रेयासोबत विद्यापीठात काम करणार्या सहकारी तरुणांनी गर्दी केली होती.
ओव्हरलोड प्रवासी वाहतुकीची बळी
विद्यापीठातून गावात येण्यासाठी वाहने मिळत नाही. त्यामुळे नाईलाजाने येथील कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांना ओव्हरलोड रिक्षामधून प्रवास करण्याची वेळ येते. रिक्षाचालकही प्रवाशाची मजबुरी हेरून समोर प्रवासी बसवितात व वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करतात. आतातरी प्रवाशांची मर्यादपेक्षा जास्त वाहतूक करणार्या रिक्षाचालकांवर कारवाई होवून हा प्रकार थांबेल का? अरुंद महामार्ग तसेच खोल साईडपट्टी कारणीभूत ठरल्याने अपघात होवून रिक्षा उलटल्याने कुठल्याही उपाययोजना न करणार्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल होतील काय? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
जखमी तरुण पत्रकारितेचा सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी
अपघातानंतर काही काळासाठी वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मात्र माजी मंत्री शरद पवार यांच्या बंदोबस्तामुळे महामार्गावर आधीच वाहतूक पोलीस तैनात असल्याने काही काळानंतर वाहतूक सुरळीत झाली होती. अपघाताच्या ठिकाणी ये-जा करणार्या वाहनधारकांसह नागरिकांची गर्दी झाली होती. श्रेया जवळ असलेल्या पर्समधील दुचाकीच्या लायसन्सवरुन ओळख पटली होती. जखमींच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती. जखमी परमेश्वर थाटे हा विद्यापीठाचा जनसंवाद व पत्रकारिता विभागाचा सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी आहे.